पावसामुळे सत्ताधाऱ्यांची पोलखोल
पालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना मिळाले नवे मुद्दे
विनोद राऊत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः मुंबईत सोमवारी (ता. २७) बरसलेल्या मुसळधार पावसामुळे महापालिका प्रशासनाच्या कामकाजाची पोलखोल झाली आहे. वरळी भूमिगत मेट्रो स्थानकामध्ये झालेली पडझड, नालेसफाई, सिमेंट रोड बांधकामाची चुकलेली डेडलाइन, असे अनेक मुद्दे विरोधकांना मिळाले आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
पाण्याचा उपसा करण्यासाठी भूमिगत टाक्या बांधल्यामुळे गेल्या दोन वर्षांत मुसळधार पावसातही हिंदमाता परिसरात पाणी साचले नव्हते. सोमवारी हिंदमाता परिसर पुन्हा पुर्वीसारखा जलमय झाला होता. अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या मेट्रो भुयारी मार्गावरील वरळी स्थानकाची अवस्था अतिशय बिकट झाली होती. हे सर्व चित्र मुंबईकरांना अस्वस्थ करणारे होते.
गेल्या तीन वर्षांपासून मुंबई महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. प्रशासनाच्या दोऱ्या कुणाच्या हातात आहेत, हे आता सामान्य मुबईकरांना समजले आहे. हे सर्व मुद्दे पालिका निवडणुकीत प्रभावी ठरणार आहेत. पक्ष हे मुद्दे निवडणुकांपर्यंत लावून धरणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेवकाने सांगितले.
सोमवारच्या पावसानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे मैदानात उतरले. त्यांनी मुंबईचा दौरा केला. मंगळवारी (ता. २७) पत्रकार परिषदही घेतली. आदित्य ठाकरे हे त्या आक्रमकतेने सत्ताधारी पक्षावर टीका करत आहेत, त्यावरून पालिका निवडणुका त्यांच्याच नेतृत्त्वात लढवल्या जाणार असल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड या काही दिवसांपासून हे मुद्दे लावून धरत आहेत, मात्र मुंबईच्या नागरी प्रश्नांवर केवळ हे दोन नेते बोलताना दिसतात. शिवसेनेकडे शाखांचे प्रभावी नेटवर्क आहे, मात्र त्याचा वापर पावसाळ्यापूर्वी केली जाणारी नालेसफाई किंवा सिमेंट रोड बांधकामाबाबतचा भ्रष्टाचार, दिरंगाई समोर आणण्यासाठी याचा फारसा झाला नसल्याचे मत राजकीय विश्लेषक संजय पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. मुबईकरांना विश्वासात न घेता अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. सोमवारच्या पावसाने याचे बिंग फुटले आहे. पालिकेच्या निवडणुकांसाठी या महत्त्वाच्या मुद्यांवर विरोधी पक्ष वातावरणनिर्मिती कशी करतात, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत, असे त्यांनी सांगितले.
पावसामुळे नालेसफाई, मेट्रोची झालेली वाताहत यावर चर्चा सुरू आहे. पालिका निवडणुकीसाठी हे हत्यार विरोधकांना आयतेच मिळाले आहे. महायुतीच्या हाती केंद्र, राज्य व पालिका प्रशासन असूनही मुंबईची दैना का झाली, हा प्रश्न त्यांना अडचणीत आणणारा आहे.
- प्रताप आसबे,
राजकीय विश्लेषक
मुंबईतील रस्ते, नाले, मेट्रो आणि विविध विकासकामांवर लक्ष केंद्रित करून आदित्य ठाकरे हे भाजपा आणि शिंदे यांच्यावर टीका करीत आहेत. हे पाहता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आदित्य यांना प्रोजेक्ट केले जात आहे.
- हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार
२५ वर्षे भाजपा शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत सत्तेत होती, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते होते. मग दोघांनी या काळात काय केले.
- हर्षवर्धन सपकाळ,
प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
मागील २५ वर्षांच्या बेजबाबदार नियोजनांमुळे मुंबईवर ही परिस्थिती ओढवली आहे.
- ॲड. आशीष शेलार,
पालकमंत्री, मुंबई उपनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.