अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई
कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ग प्रभाग अंतर्गत गुरुवारी (ता. २९) आयरे गावात गटार व नालेसफसफाईसंदर्भात प्रभागाच्या सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी निरीक्षण व पाहणी केली. यादरम्यान संबंधित परिसरात अनधिकृत चाळीचे बांधकाम आढळून आले. पाहणीवेळी महापालिकेच्या ग प्रभागाच्या पथकाला १५ जोत्यांचे (फाउंडेशन) बांधकाम व पाच पूर्ण झालेल्या खोल्यांचे अनधिकृत बांधकाम निदर्शनास आले. हे बांधकाम सार्वजनिक गटार व नाल्यावर अतिक्रमण करून करण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेच्या ग प्रभागाच्या अतिक्रमणविरोधी पथकाद्वारे त्वरित तोडक कारवाई करण्यात आली. परिसरात स्वच्छता व मोकळेपणा राखण्यात आलेला आहे. महापालिकेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमण सहन केले जाणार नाही, तसेच याविरोधात सातत्याने कठोर पावले उचलली जातील.
...................
अर्जुन ढाकणे हा काळाच्या पुढील अभिनेता
कल्याण (वार्ताहर) : अभिनेते व लेखक अर्जुन ढाकणे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. अर्जुन ढाकणे हे पु. ल. कट्टा या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. त्या अनुषंगाने अर्जुन ढाकणे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पु. ल. कट्टा संस्थेने पु. ल. कट्टा वाचनालय येथे नुकतेच श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या वेळी नाट्य दिग्दर्शक, सिने, नाट्य अभिनेते राम दौंड म्हणाले, की अर्जुन ढाकणे हा माझा मित्र होता. कविता कशी लिहावी, त्यासाठी काय वाचावे, याबाबत मला धडे देत होता. तेव्हाच तो मी दिग्दर्शन करीत असलेल्या नाटक, एकांकिकेत अभिनय करीत होता. त्या वेळी अभिनय करताना त्याने आपल्यातला कवी कधीच आपल्या अभिनेत्यावर हावी होऊ दिला नाही. ढाकणे याचा अभिनय सहज आणि नैसर्गिक होता. तो काळाच्या पुढचा अभिनेता होता, असे माझे मत आहे, असे त्यांनी सांगितले. संस्थेचे संयोजक प्रा. महेंद्र भावसार, किशोर खराटे, संजय वाजपेयी, रमेश आव्हाड, ज्योती अय्यर, विजय यांनी अर्जुन ढाकणे यांच्या आठवणी व किस्से सांगून त्यांच्या आरस्पानी या काव्यसंग्रहातील कविता सादर केल्या. या वेळी अर्जुन ढाकणे यांची मुले अद्वैत, स्वामी ही उपस्थित होती. या वेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजळा देत त्यांचा काव्यसंग्रह उपस्थिताना भेट दिला.
..............
ग्राहक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
कल्याण (वार्ताहर) : खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट आणि सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी एकदिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन १ जून रोजी कल्याणच्या के. एम. अगरवाल कॉलेजच्या ऑडिटरियममध्ये करण्यात आले आहे. सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत दोन सत्रांत होणाऱ्या या शिबिरात संभाषण कौशल्य व सहकारी गृहनिर्माण संस्थांना विविध विषयांवर तज्ज्ञ मान्यवर, ग्राहक संरक्षण कक्ष राज्य कार्यकारिणी पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील मान्यवर शिवसेना पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात कल्याण शहर व परिसरातील गृहनिर्माण संस्थेच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, गृहनिर्माण संस्था चळवळीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कक्ष जिल्हा संघटक प्रथमेश पुण्यार्थी यांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम समितीचे कक्ष विभाग संघटक जयवंत टापरे, उदयभान सिंग व इतर कक्ष पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.
.................
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
डोंबिवली, ता. ३० (बातमीदार) : डोंबिवलीच्या ब्राह्मण सभेत शुक्रवारी (ता. ३०) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिजन्म शताब्दी निमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला (नि.) ले. कर्नल चंद्रशेखर रानडे व नौदलाचे (नि) कॅप्टन रवींद्र चौहान विशेष अतिथी म्हणून हजर होते. निवृत्त मेजर मोहिनी गर्गे कुळकर्णी या प्रमुख वक्त्या होत्या. कार्यक्रमात संस्कृत भारतीचे वेदमूर्ती रवींद्र खाडीलकर यांनी संकल्प सांगितला. तसेच कर्नल रानडे यांनी समायोजित मोलाचे विचार अत्यंत थोडक्यात पण स्पष्टपणे मांडले. भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर परब यांनी प्रास्ताविकात अहिल्यादेवींची थोडक्यात माहिती दिली. तर भारतीय इतिहास संकलन समितीच्या जिल्हा कार्यवाह सुखदा रावदेव यांनी थोडक्यात इतिहास संकलन समितीच्या हेतूचा प्रांतातील कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमात डॉ. श्री. श्रीनिवास आठल्ये यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्यावर लिहिलेल्या गीतांच्या ध्वनी चित्रफितीचे मेजर मोहिनी गर्गे कुळकर्णी यांनी लोकार्पण केले. प्रज्ञेश प्रभुघाटे, डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष प्रिया जोशी, प्रकाश पवार यांनी या सोहळ्यासाठी विशेष कष्ट घेतले. नगरसेवक राहुल दामले, खुशबू चौधरी, नंदू जोशी, शशिकांत कांबळे, नाना सूर्यवंशी, पप्पू म्हात्रे या वेळी उपस्थित होते.
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.