शामकांत पतंगराव ः सकाळ वृत्तसेवा
किन्हवली, ता.३१ ः शहापूर तालुक्यातील गेगाव ग्रामस्थांनी सहकुटुंब दोन दिवसीय वनभोजनाची पन्नास वर्षांची परंपरा यंदाही कायम राखली. गावातील एकोपा व बंधुभाव कायम राहावा तसेच बळीराजावर कोणतेही आरिष्ट येऊ नये म्हणून वनदेवतांना साकडे घालणे, या मागचा उद्देश आहे.
सातशे ते आठशे लोकसंख्येचे गाव असलेल्या शहापूर तालुक्यातील शेंद्रूण-किन्हवली मार्गावरील गेगावात सरकारी आस्थापना तसेच प्रशासकीय सेवेतील अनेकजण राहतात. आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात या गावाने स्वतःचा असा नावलौकिक निर्माण केला आहे. तसेच पारंपारिक रीती परंपरा देखील जपल्या आहेत. या गावात गेल्या पन्नास वर्षांपासून वनभोजनाची परंपरा जोपासली जात आहे. ग्रामदेवतांच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर गावातील रहिवासी घराला टाळे लाऊन वनभोजनासाठी गावाबाहेर पडतात. वनभोजनाचा हा कार्यक्रम दोन दिवस असतो. गावातील वाद क्लेश दूर करताना एकोप्याची भावना वाढीला लागावी तसेच सहकार्य, प्रेम आणि बंधुत्वाची भावना कायम राहावी, या उद्देशातून ही परंपरा जोपासण्यात आली आहे.
---------------------------------------
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
पावसाळी मशागतीच्या हंगामात बळीराजावर कोणतेही नैसर्गिक आरिष्ट येऊ नये म्हणून वनदेवतांना प्रसन्न करण्यासाठी वनभोजनाची परंपरा आहे. गावातील सर्व ग्रामदेवता, कुलदेवता यांचा अभिषेक करून सर्व ग्रामस्थ पारंपरिक वेषात टाळ मृदुंगाच्या गजरात, वान सामानाचे गाठोडे डोक्यावर घेऊन महिला, मुले गावाच्या वेशीजवळ नदी किनारी एकत्र जमतात. वनभोजनाच्या पहिल्या दिवशी शाकाहारी तर दुसऱ्या दिवशी मांसाहारी स्वयंपाक केला जातो. यावेळी बालगोपाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम, वारकरी मंडळींचे भजन, हरिपाठ, महिलांच्या फुगड्या कार्यक्रमाचे आकर्षण असते.
---------------------------------------
पूर्वापार परंपरा जोपासताना सातत्याने बदलणारे हवामान, सजीवांवर होणारे परिणाम, शेतीसाठी वापरात येणारे नवे तंत्रज्ञान तसेच सध्याच्या वैज्ञानिक युगाचे महत्त्व पटावे म्हणून ग्रामस्थांमध्ये साधकबाधक चर्चा हा उपक्रमाचा हेतू आहे. यानिमित्ताने सामाजिक एकोपा जपला जातो.
- विठ्ठल डोंगरे, ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.