मुंबई

पलावा पुलाचे काम संथगतीने

CD

पलावा पुलाचे काम संथगतीने
शिवसेना ठाकरे गट, मनसे आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यातच डोंबिवलीतील पलावा पुलाच्या संथगतीने सुरू असलेल्या कामाच्या विरोधात शनिवारी (ता. ३१) ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले. युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील; मात्र स्थानिक पातळीवर राजकारण कसे करायचे याचे आम्हाला चांगले ज्ञान आहे, असे मनसे नेते राजू पाटील म्हणाले. तर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे म्हणाले, की आम्ही दोघे कायम स्थानिक प्रश्नांसाठी संपर्कात असतो. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत मनसे आणि ठाकरे गट मिळून शिवसेना शिंदे गटाला घेरण्याची शक्यता आहे.

कल्याण-शिळ रोडवरील पलावा पुलाचे गेल्या सात वर्षांपासून काम सुरू आहे. अत्यंत संथगतीने हे काम सुरू असून, वारंवार पुलाच्या कामाची मुदत वाढवली जात आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी नुकतेच पलावा पूल मे महिन्याच्या अखेरीस सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने शनिवारी पलावा पुलाच्या कामाची पाहणी करण्याचे ठरविले. त्यानुसार ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी शनिवारी पुलाची पाहणी केली. या वेळी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाबरोबरच मनसे नेते राजू पाटील आणि पदाधिकारी यांनीदेखील पलावा पुलाची पाहणी केली.

अनेक वर्षे पुलाचे काम रखडल्यामुळे दोन्ही गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या वेळेला शिवसेनेने गाजर दाखवत निषेध व्यक्त केला, तर मनसेच्या राजू पाटील यांनी चक्क ५००च्या नोटा दाखवत निषेध केला. दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. एकत्र येऊन आम्ही सत्ताधारी लोकांना जाब विचारण्याचे काम करू. पुलाचे काम अर्धवट असताना तारखांवरती तारखा दिल्या जातात. जनतेची फसवणूक करून मत लाटण्याचे काम हे करीत आहेत, असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले. तर मनसेचे नेते पाटील म्हणाले, की दीपेश यांनी फोन केल्यामुळे मी आलो. पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. निवडणुकीच्या आधी नक्कीच हा पूर्ण सुरू होईल; मात्र पूल सुरू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाहीत. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या पुलाचे काम रखडले आहे. तिकडचा पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इकडचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे म्हणाले, की स्थानिक प्रश्नांसाठी आम्ही एकत्र येत असतो. राजू पाटील यांच्या संपर्कात त्यासाठी असतो. या पुलासाठी पाटीलसुद्धा पाठपुरावा करीत आहेत. सात वर्षे झाली सत्ताधारी पक्षांकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. ३१ तारखेला या पुलाचे काम पूर्ण होऊन तो लोकांसाठी सुरू होणार होता. ते पाहण्यासाठी आलो होतो, पण इथे उद्घाटनाला कोणीही दिसले नाही. आमदार नाही, स्थानिक नेते कोणी दिसले नाहीत. मग मी राजू पाटील यांना फोन केला, तुम्ही पण या आपण पाहणी करू आणि बघितले तर पुलाचे काम अजून पूर्ण नाही. सत्ताधारी पक्षांना फक्त पक्षफोडीशिवाय काही दिसत नाही; विकासाचे राजकारण होताना दिसत नाही, असे ते म्हणाले.

मराठी माणूस जागा दाखवेल
ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे. नेते ही इच्छा पूर्ण करतील, अशी अपेक्षा आहे. येत्या काळात महाराष्ट्रात चांगले चित्र दिसेल. मंत्री प्रताप सरनाईक हे डोंबिवलीमधील आहेत. ते कदाचित मराठी माणसाला हलक्यात घेतात. मराठी माणसाला हलक्यात घेऊ नका. येत्या महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला मराठी माणूस आपली जागा दाखवेल, असा इशारा म्हात्रे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT