बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनाची रखडपट्टी
पुरातत्त्व विभागाची नकारघंटा; इतिहासप्रेमींमध्ये नाराजी
तुर्भे, ता. ३१ (बातमीदार) ः नवी मुंबईमधील एकमेव ऐतिहासिक ठेवा असलेल्या बेलापूर किल्ल्याचे संवर्धन व सुशोभीकरणाचे काम सिडकोने हाती घेतले होते. यासाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर मात्र हे काम पुरातत्त्व खात्याकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र हे काम करण्यास पुरातत्त्व खाते इच्छुक नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम अद्यापही रखडले आहे.
बेलापूरमधील ऐतिहासिक किल्ल्याची दुरवस्था झाल्याने सिडकोमार्फत २०१९ मध्ये संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार खासगी ठेकेदाराला संबंधित कंत्राट देण्यात आले होते; मात्र या कंत्राटदाराने पुरातत्त्व खात्याचे नियम डावलून काम सुरू ठेवले. याबाबत शिवप्रेमींनी सिडको आणि शासनदरबारी तक्रारी करण्यात आल्या होत्या; मात्र सिडकोने या तक्रारींकडे पुरते दुर्लक्ष केले. त्यानंतर १२ जून २०२१ रोजी काम सुरू असतानाच या किल्ल्याचा टेहळणी बुरूज ढासळला. त्यानंतर पुरातत्त्व खाते आणि सिडको अधिकारी यांनी केलेल्या पाहणीत किल्ल्यात चुकीचे काम झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार बेलापूर किल्ल्याचे काम पुरातत्त्व खात्याच्या सूचनांनुसार सुरू होणार होते. त्यामुळे हे काम पुरातत्त्व खात्याकडे हस्तांतर करण्याचा निर्णय जुलै २०२२ मध्ये घेण्यात आला होता; मात्र या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम हस्तांतर करून घेण्यास पुरातत्त्व खाते इच्छुक नसल्याचे समोर आले. त्यामुळे या कामाचा प्रस्ताव सिडकोने शासनास पाठवला आहे; मात्र त्यावर अद्यापही निर्णय न झाल्याने बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम रखडले आहे.
.....................
या किल्याचे संवर्धन करावे, यासाठी इतिहासप्रेमींनी वारंवार पाठपुरावा केला होता. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडको व शासनाकडे किल्ला संवर्धनासाठी पाठपुरावा केला होता. आमदारांच्या अभ्यासगटालाही पाहणीसाठी बोलावले होते. यानंतर सिडकोने किल्ला संवर्धनाचा निर्णय घेतला. १६ जून २०१९ मध्ये प्रत्यक्षात सुशोभीकरणाचे काम सुरू झाले होते. यासाठी १८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते; मात्र सध्या हस्तांतराच्या वादात संवर्धनाचे काम रखडल्याने कामाला कधी मुहूर्त मिळणार, असा सवाल इतिहासप्रेमी करीत आहेत.
................
बेलापूर किल्ल्याच्या मुख्य बुरूजासह टेहळणी बुरूजाचे काम पुरातत्त्व खात्यानुसार यापुढे सुरू राहावे, म्हणून हे काम संबंधित खात्याकडे हस्तांतर करण्याचे प्रस्तावित केले होते. हे काम हस्तांतर करून घेण्यास पुरातत्त्व खाते तयार नसून सिडकोलाही ते करू देत नाही. त्यामुळे याबाबत काम कोणी करावे, म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर निर्णय होऊन जर काम सिडकोला करण्याचे आदेश आले तर संवर्धनाच्या कामाला तत्काळ सुरुवात होईल.
- गोकुळ राठोड, कार्यकारी अभियंता, सिडको
.................
राजकारण करून काम थांबविण्यात आले आहे. तसेच सिडको संवर्धनाचे काम करीत असताना हे काम पुरातत्त्व खात्याकडे देण्याचा अट्टाहास काही जणांकडून करण्यात आला; मात्र पुरातत्त्व खात्याकडे निधी नसल्याने काम रखडले आहे.
- मंदा म्हात्रे, स्थानिक आमदार, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.