वडोल गाव रस्त्याच्या कामास सुरुवात
लोकशाही मार्गाने उपोषणकर्त्या नागरिकांनी जिंकला लढा
विद्यार्थ्यांचा शाळेचा मार्ग सुकर
उल्हासनगर, ता. ३१ (बातमीदार)ः गेल्या तीन दिवसांपासून वडोल गाव पुलासमोरील रस्त्याच्या दुर्दशेविरोधात सुरू केलेला आमरण उपोषणाचा लढा लोकशाही मार्गाने नागरिकांनी जिंकला आहे. ओमी कलानी यांनी उपोषणस्थळी भेट दिल्यावर आणि आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी आदेश देताच ठेकेदाराने रस्त्याच्या कामास सुरुवात केली. यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
वडोल गाव पुलासमोरील रस्त्याचे काम ठेकेदाराने पूर्ण बिल घेऊनही अर्धवट सोडले होते. ही बाब राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते शिवाजी रगडे यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपायुक्त विशाखा मोटघरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ठेकेदाराने दोन दिवसांत कामाची सुरुवात करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांनी दिले होते.
मात्र दोन दिवस उलटून गेल्यावरही कामाबाबत चालढकलपणा केला जात असल्याने शिवाजी रगडे, गजानन शेळके, फिरोज खान यांनी उपोषणास सुरुवात केली होती. या उपोषणस्थळी ओमी कलानी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते कमलेश निकम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख राधाचरण करोतीया, मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू देशमुख, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील, राष्ट्रकल्याण पार्टीचे शैलेश तिवारी आदींनी भेट दिली होती. ॲड. स्वप्नील पाटील यांनी एका दिवसात रस्त्याच्या कामास सुरुवात केली नाही, तर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आयुक्तांच्या दालनात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
शेवटी उपोषणाला मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहून आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये व अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, विशाखा मोटघरे, शहर अभियंता हनुमंत खरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांनी ठेकेदाराला नोटीस बजावल्यावर रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आल्याने उपोषणाची सांगता झाली आहे.
फोटो कॅप्शन
ओमी कलानी यांनी उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर रस्त्याच्या कामास सुरुवात झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.