पालिका रुग्णालयांत मधुमेहावरील औषधाचा तुटवडा
पूर्व उपनगरांत रुग्णांच्या तक्रारी; गोळ्या बाहेरून विकत घेण्याची वेळ
चेंबूर, ता. ३१ (बातमीदार) ः मुंबई महापालिकेच्या पूर्व उपनगरांतील काही रुग्णालयांमध्ये मधुमेहावरील औषधांचा मोठा तुटवडा असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे गोळ्या बाहेरून विकत घ्याव्या लागत असल्याचे रुग्ण सांगत आहेत.
मुंबईकरांना मोफत आणि अल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पालिका प्रशासनाने मुंबई व उपनगरांत अत्याधुनिक रुग्णालय, आरोग्य केंद्र तसेच आपला दवाखाना सेवा सुरू केली आहे. या रुग्णालयात लाखो गरीब रुग्ण उपचारादरम्यान औषधाचा लाभ घेत असतात. डॉक्टरांची कमतरता, रुग्णांना बेड न मिळणे, योग्य उपचार, औषधे मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मेटफॉर्मिन किंवा डाओनिल गोळीचा वापर केला जातो. सध्या गोवंडी येथील पालिकेचे शताब्दी रुग्णालय, कुर्ला येथील भाभा रुग्णालय आणि अन्य रुग्णालयांत डाओनिल गोळ्यांचा मोठा तुटवडा भासत असल्याने गरीब रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. एका पॅकेटसाठी रुग्णांना एकूण ६० ते ७० रुपये मोजावे लागत आहेत. अनेकदा परिस्थितीअभावी गोळी विकत न घेतल्यामुळे काही रुग्णांला विविध आजार बळावत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
भारतात मधुमेह रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एकीकडे केंद्र सरकार आपला देश मधुमेहमुक्त करण्यासाठी अभियान राबवित आहे. दुसरीकडे मधुमेही रुग्णांना डाओनिल औषधासाठी पालिका रुग्णालयांत वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. पालिका प्रशासनाने त्वरित डाओनिल औषधाचा पुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नेस्ट संघटनेचे सल्लागार ॲड. संतोष धोत्रे, प्रा. स्वानंदी नाकते, ॲड. विशाल गायकवाड यांनी दिला आहे.
सध्या मधुमेहावरील गोळ्यांचा तुटवडा असल्याचे गोवंडीतील शताब्दी रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी जयंत चिलकुथ यांनी सांगितले. यासंदर्भात पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
कित्येक वर्षांपासून मला मधुमेहाचा त्रास आहे. मी पालिका रुग्णालयात उपचार घेण्यास जातो. डॉक्टर तपासून गोळ्या लिहून देतात. मात्र या गोळ्या रुग्णालयात उपलब्ध नसल्याने बाहेरून विकत घ्याव्या लागतात.
- दिगंबर वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते
सध्या राजावाडी रुग्णालयात मधुमेहाच्या गोळ्या आहेत. कधी तरी अडचण निर्माण झाल्यानंतर रुग्णांना त्रास होतो. पालिका प्रशासनाने लक्ष घालून सर्व रुग्णालयांत मधुमेहावरील गोळ्यांचा मुबलक पुरवठा करावा.
- प्रकाश वाणी,
मुंबई जिल्हा समन्वयक, शिवसेना आरोग्य सेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.