वाशी, ता. १ (बातमीदार) ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दक्षता पथकाने उरण परिसरातून तुरीचा कंटेनर ताब्यात घेतला. संबंधित व्यापाऱ्याने कर चुकवून तब्बल २०० कंटेनरमधून पाच हजार १० टन तूर आयात केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावर एक कोटी ११ लाख ४८ हजार रुपयांचा दंड आकारून प्रशासनाने दणका दिला आहे.
बिनपरवाना व बाजार समितीचा सेस न भरल्यामुळे आयातदाराचा तुरीचा कंटेनर परस्पर विक्रीसाठी घेऊन जात असताना मुंबई एपीएमसी दक्षता पथकाने जप्त केला आहे. या आयातदाराने बाजार समितीकडून कोणतीही परवानगी घेतलेले नव्हती. तब्बल २०० कंटेनरमध्ये पाच हजार १० टन तूर दुबईमधून आयात केल्यावर न्हावा-शेवा येथील एका कंटेनर गोदामात ठेवण्यात आली आहे. या तुरीची किंमत अंदाजे ३४ कोटी ६० लाख रुपये आहे. यावर बाजार समिती प्रशासनाने एक कोटी ११ लाख ४८ हजारांचा रुपये दंडवसुली करण्यात येणार आहे.
बाजार समितीच्या इतिहासात ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. बाजार समितीचा कार्यक्षेत्रात बिनापरवाना व सेस न भरता मोठ्या प्रमाणात शेतमालाचा आयात करणाऱ्या एका आयातदारावर ही कारवाई करण्यात आली आहे. बाजार फी, देखरेख खर्च न भरता बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात व्यवहार करत असल्याचे दक्षता पथकाला आढळल्यावर वाहन ताब्यात घेऊन मुख्यालयात आणले होते.
तीन पट दंड आकारला
आयातदाराने शेतमाल बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात आणण्यापूर्वी कोणतीही पूर्व सूचना दिली नाही. बाजार शुल्क व देखरेख खर्च चुकविण्याच्या आयाततदाराचा हेतू असल्याचे स्पष्ट झाल्यावर महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमनानुसार तीन पट दंड आकारण्याची कार्यवाही करण्यात आली. यात बाजार फी, देखरेख खर्च व आनुषंगिक खर्च वसूल करण्यात येणार आहे.
परवान्यासह व्यापाराचे आवाहन
बाजार समितीचे सभापती प्रभू पाटील, उपसभापती हुकुमचंद आमदरे, सचिव पी. एल. खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसचिव महेश साळुंखे, संजय खांडेकर, अजित नारंगकर, विनीत उबाळे, अनंत पारदुले यांनी ही कारवाई केली. दक्षता पथकाने दाखवलेली तत्परता आणि दक्षता यामुळे भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलली जाणार आहेत, तर व्यापाऱ्यांनी अशा प्रकारे अनधिकृतपणे व्यापार, आयात-निर्यात करण्यापेक्षा बाजार समितीची परवाना घेऊन व्यापार करावा, असे आवाहन एपीएमसी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.