सुके बोंबील, मांदेली खरेदीसाठी लगबग
ठाणे, ता. १ (बातमीदार) : यंदा मे महिन्याच्या अखेरीसच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परिणामी, पावसाळ्यापूर्वीच सुके बोंबील, मांदेली, माखली, करंदीच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. प्रत्येक वर्षी जून ते ऑगस्टदरम्यान समुद्रात मासेमारीस बंदी असते. त्यामुळे पावसाळ्यात दरवाढ होणे आणि ताज्या माशांची कमतरता ही समस्या जाणवते; यंदा मात्र पावसाच्या आगमनाने सुक्या माशांच्या प्रकारांचा हंगाम लवकर सुरू झाला आहे. सध्या ठाण्यातील बाजारात खारबाव, उत्तन, भिवंडी, वसई, उरण, पनवेल या भागांतील महिला विक्रेत्या सुके बोंबील, मांदेली, माखली, करंदी, बांगडे, जवना, अवका, कट, सोडे वगैरे विक्रीस आणत आहेत. त्यामुळे बाजारात चांगली आवक दिसून येत आहे.
सध्या बोंबील लहान ते मोठ्या आकारात ७०० ते ८०० रुपये प्रतिकिलो, मांदेली १८० ते २०० रुपये वाटा, सोडे ९०० ते ८५० रुपये किलो, माखली २५० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. करदी व जवना हे प्रकार १०० ते १३० रुपये वाट्याप्रमाणे विकले जात आहेत. दर वाढले असले तरी ग्राहकांच्या खरेदीची उत्सुकता तसूभरही कमी झालेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून अचानक आलेल्या पावसामुळे मासेमारीवर परिणाम झाल्याने बाजारात माशांची आवक घटली आहे. परिणामी, ग्राहकांनी पर्याय म्हणून सुके बोंबील, मांदेली, माखली यांना पसंती दिली आहे. अनेक महिलांनी आधीच घरगुती वापरासाठी सुकी मच्छी साठवण्यास सुरुवात केली असून, यामुळे बाजारात सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी वाढते आहे. सध्या सुके बोंबील, माखली, मांदेली यांचा बाजार चांगलाच गतिमान झाला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच मच्छीप्रेमींसाठी हा हंगाम पर्वणी ठरतोय. यामुळे पुढील काही आठवड्यांत दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी वेळीच खरेदी करून साठवणूक करून ठेवण्याचा सल्ला विक्रेत्यांकडून दिला जात आहे.
लवकर हंगाम
पावसाळ्यात सुके बोंबील व माखलीची मागणी वाढते. यावर्षी पावसामुळे हंगाम लवकर सुरू झाल्याने आम्हालाही तयारीने यावे लागले. आवक कमी असल्याने दर थोडेसे वाढले आहेत; पण ग्राहक खरेदी करतात, अशी प्रतिक्रिया विक्रेत्या सुरेखा गांधी यांनी दिली.
पावसाळ्यात माशांची टंचाई होतेच, म्हणून आम्ही दरवर्षी आधीच सुकी मच्छी साठवतो. यंदा पाऊस लवकर आल्याने बाजारात गर्दी वाढली आहे. किमती थोड्या वाढल्या असल्या तरी बोंबील, मांदेली साठवणे गरजेचे आहे.
- कांचन जाधव, गृहिणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.