बोरले-जिते-कुंभे रस्त्याची दयनीय अवस्था
तीन वर्षांपूर्वीच दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च
कर्जत, ता. ११ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील नेरळहून आंबिवली-दामतमार्गे पुढे जाणारा ऐतिहासिक पेशवाई मार्ग अर्थात बोरले-जिते-कुंभे रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिकांसह वाहनचालकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामासाठी २०२२ रोजी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला असून, हे काम नवी मुंबईतील एका खासगी कंपनीकडून करण्यात आले होते, मात्र अल्पावधीतच हा रस्ता खराब झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या पावसाळी दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक तालुक्यातील विविध पर्यटनस्थळी भेट देतात. त्यामुळे तालुक्याला पर्यटनामधून चांगले उत्पन्न मिळते, मात्र येथील रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिकांसह पर्यटकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. नेरळहून आंबिवली-दामतमार्गे पुढे जाणारा ऐतिहासिक पेशवाई मार्ग अर्थात बोरले-जिते-कुंभे रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या कामासाठी तीन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. नवी मुंबईतील एका खासगी कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला होता. या रस्त्याच्या कामानंतर पुढील पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही संबंधित ठेकेदार कंपनीची होती, मात्र प्रत्यक्षात आज रस्त्यावर मोठ्या खड्ड्यांची मालिका, डांबरी थर उखडलेला आणि गटारे, मोऱ्या, किनारी पट्टे यांची पूर्णपणे उपेक्षा झाल्याचे दिसून येते. पावसाळ्यात रस्त्यावरून वाहतूक करताना नागरिकांना चिखल व पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. एसटी बसचालकांसह प्रवाशांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
...........
आंदोलनाचा इशारा
स्थानिकांनी सांगितले की, गवत-झुडपांची वेळेवर सफाई, खड्ड्यांची डागडुजी, पथदिव्यांची व्यवस्था, गटारांची वार्षिक देखभाल याचे कोणतेही काम गेल्या दोन वर्षांत झालेले नाही. विशेष म्हणजे शाळकरी मुले व विद्यार्थिनींना शाळा सुटल्यानंतर याच रस्त्यावरून चालत जावे लागते. अंधार, खड्डे आणि अपघाताच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट असून, यावर तत्काळ लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी व देखभाल सुरू करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.