मोफत नेत्रतपासणी शिबिरात ४४ रुग्णांची तपासणी
माणगाव (बातमीदार) ः माणगाव शहरात मोफत नेत्रतपासणी शिबिरात ४४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व मेथा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हे शिबिर पार पडले. या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवीन ४४ रुग्णांची तपासणी करून ३० नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया केली. हे शिबिर दर महिन्याच्या एका बुधवारी पार पडले. माणगावात गेल्या दोन वर्षांत ३६ वेळा शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व माणगाव येथील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे मोफत नेत्ररोग व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आतापर्यंत २,७६२ हून अधिक नेत्ररुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
................
नारंगी येथे नवीन शिशू वर्गखोल्यांचे उद्घाटन
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील नारंगी येथे राजिप नारंगी शाळा व्यवस्थापन समिती व नारंगी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या शिशू वर्गांसाठी बांधण्यात आलेल्या (ज्युनियर केजी व सीनियर केजी) अशा दोन वर्गखोल्यांचे नुकतेच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मागील काही वर्षांपासून पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पटसंख्येअभावी जिल्हा परिषद शाळा बंद पडू नये, यासाठी राजिप नारंगी शाळा व्यवस्थापन समिती व नारंगी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिशू वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. आपल्या गावामधील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी नारंगी ग्रामपंचायतीने हाती घेतलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी बोलताना सांगितले. या शिशूवर्गाच्या इमारत बांधकामकरिता समीरा हॅबिटॅटने सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अर्थसहाय्य केल्याचे सरपंच उदय म्हात्रे यांनी सांगितले. तसेच ग्रामपंचायतीने या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतल्याचेदेखील म्हात्रे यांनी सांगितले. याप्रसंगी राजिपचे माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, राजिपच्या माजी सदस्या मानसी दळवी, चित्रा पाटील, समीरा हॅबिटॅटचे व्यवस्थापकीय संचालक समीर नेरूरकर, शिरवलीचे सरपंच प्रणिकेत म्हात्रे, चिंचवलीचे सरपंच राजाभाऊ गावंड, डॉ. जगन्नाथ पाटील, चंद्रकांत मोकल, नयन पिमेंटा, केतन म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
...........
खोपोलीत क्रीडापटूंसाठी काशी स्पोर्ट सेंटरची स्थापना
खोपोली (बातमीदार) ः खोपोलीतील काशी स्पोर्ट सेंटरचे उद्घाटन नुकतेच पोलिस अधीक्षक विक्रम कदम यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले. काशी स्पोर्ट सेंटरच्या माध्यमातून अत्यंत माफक दरात शहरातील तरुण व क्रीडापटूंना विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारचा आनंद, सराव व कौशल्य मिळवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. या सेंटरच्या माध्यमातून भविष्यात खोपोली परिसरातून उत्तम क्रीडापटू तयार होतील, असे पोलिस अधीक्षक विक्रम कदम यांनी या वेळी सांगितले. माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील, उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे व डॉ. पंकज पाटील यांनीही या भव्य क्रीडा सेंटरला शुभेच्छा देत साबळे परिवाराच्या या उपक्रमाचा संपूर्ण शहरातील तरुणांना लाभ होणार असल्याचे सांगितले. या क्रीडा सेंटरमध्ये क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळसह अन्य विविध प्रकारचे क्रीडा सराव करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शहरातील सर्व शाळांचे आजी व माजी क्रीडा शिक्षक, क्रीडा क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरी केलेले क्रीडापटू व प्रशिक्षकांचा सन्मान काशी स्पोर्ट सेंटरच्या माध्यमातून यशवंत साबळे व विक्रम साबळे यांच्या माध्यमातून करण्यात आला.
.........
म्हसळ्यात मनसेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
श्रीवर्धन (बातमीदार) : म्हसळा शहर आणि तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मंगळवारी (ता. १०) जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांच्या श्रीवर्धन दौऱ्याच्या निमित्ताने म्हसळा शासकीय विश्रामगृहात पार पडला. शहरप्रमुख विशाल सायकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेशामुळे म्हसळा शहर व तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद वाढली असून, युवासेनेला नवे बळ मिळाल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे यांनी बोलताना सांगितले, की हा पक्षप्रवेश संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यात युवासेनेला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. शिवसेना पक्षाच्या संघटनेत एकसंघपणे काम करणार आहोत. या कार्यक्रमास जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड, जिल्हा संघटक सुधीर सोनवणे, श्रीवर्धन विधानसभा समन्वयक रूपेश घोसाळकर, मार्गदर्शक रमेश विचारे, तालुकाप्रमुख सुरेश कुडेकर, युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, श्रीवर्धन तालुका अधिकारी निकेत कोसबे, उपतालुकाप्रमुख हेमंत नाक्ती, मुलुंड शाखाप्रमुख आनंद पवार, तालुका चिटणीस राहुल जैन, शहर अधिकारी अंकुश नटे, शहर समन्वयक जुनेद अधिकारी, अल्पसंख्याक उपशहर अध्यक्ष फहद पेनकर, उपशहर अधिकारी स्वानंद बोरकर यांच्यासह शिवसैनिक आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..................
कालवण येथे अश्विनी किशोरी वर्गाचे उद्घाटन
माणगाव (बातमीदार) ः सेवा सहयोग फाउंडेशन आणि महानगर गॅस यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरी विकास प्रकल्पाअंतर्गत माणगावमधील विविध गावांमध्ये किशोरी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागातील कालवण येथे अश्विनी किशोरी वर्गाचे उद्घाटन किशोरवयीन मुली त्यांचे पालक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे किशोरवयीन मुलींना आरोग्य, स्वच्छताविषयक माहिती आणि स्वसंरक्षणाचे धडे जसे लाठीकाठी प्रशिक्षण दिले जाते. या वेळी माणगाव समन्वयक अश्विनी गणेश समेळ, किशोरी वर्ग प्रमुख मनस्वी कालवणकर, किशोरवयीन मुलींसह त्यांचे पालक आणि ग्रामस्थ तसेच रणजीत हर्णेकर, वैभवी हर्णेकर, नियती धाडवे, संजना वाढवळ, जान्हवी हर्णेकर, बनीता वालगुडे, अनिता डिघे, सुजिता पाराप्ते, दर्शना पळसमकर आदी मान्यवर उपस्थित होते. सेवा सहयोग फाउंडेशन संचालक किशोर मोघे, किशोरी विकास प्रकल्प प्रमुख आरती नेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली किशोरी वर्गाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
...............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.