चार सदस्यांचा एक प्रभाग
महापालिका लागली कामाला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : महापलिका निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच सरकारच्या नगरविकास विभागाने नवा अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशानुसार ठाणे पालिका प्रशासन कामाला लागली आहे. २०१७ मध्ये ज्या पद्धतीने चार सदस्यांचा एक प्रभाग होता, त्याच पद्धतीने रचना करण्याचा कार्यक्रम पालिका हाती घेतला जाणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाणे पालिका निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशीच रचना असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. चार सदस्यीय पॅनेल पद्धतीनेच प्रभाग रचना करण्याचा अध्यादेशच काढण्यात आला आहे. चार सदस्यीय पॅनेल पद्धतीत २०११ ची लोकसंख्या गृहीत धरून २०१७ चा जूना पॅटर्नच गृहीत धरण्यात येणार असल्याने ही रचना आधीच ठाणे महापालिकेकडे तयार आहे, परंतु आता लोकंसख्याही २५ लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे चार सदस्यीय प्रभागात एक प्रभाग हा किमान ३० ते ३५ हजार व ५५ ते ६० हजारांपर्यंत मोठा प्रभाग जाणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. त्यानुसार प्रभागांची रचना बदलणार असल्याचे म्हटले जात आहे.
पूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तीन सदस्यीय पॅनेल पद्धतीने निवडणुका घेण्याचे जाहीर केले होते. त्यादृष्टीने पालिकेने मागील वर्षी जुलै महिन्यात आरक्षण सोडत काढून निवडणुकीची प्रक्रियादेखील पूर्ण केली होती. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून राज्य सरकारकडेदेखील मंजुरीसाठी पाठवली होती; मात्र महाविकास आघाडीच्या सरकारनंतर महायुती सत्तेत आल्यानंतर निवडणूक चार सदस्यीय पॅनेल पद्धतीने घेण्याची घोषणा करण्यात आली होती.
मतदारसंख्येत वाढ
चार सदस्यीय पॅनेल पद्धतीसाठी २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात येणार असली तरी यामध्ये मतदारांची संख्या वाढणार आहे. २०१७ च्या निवडणुकीत १२ लाख २८ हजार ६०६ इतकी मतदारांची संख्या होती, तर त्यानंतर अद्ययावत केलेल्या मतदारयाद्यांमध्ये मतदारसंख्या ६० हजारांनी वाढून ही संख्या १२ लाख ८९ हजार ७४८ इतकी झाली आहे, परंतु आता मतदारांची ही संख्या किमान दीड लाखांनी वाढलेली असू शकते, असा कयासही पालिकेने लावला आहे.
नगरसेवकांच्या संख्येचा संभ्रम
महाविकास आघाडी सरकारने यापूर्वी तीनचा पॅनेल केला होता. त्यामुळे नगरसेवकांची संख्या ही ११ ने वाढून १४२ झाली होती, तर प्रभागांच्या संख्येतही वाढ होऊन ४२ प्रभाग तयार झाले होते. त्यामुळे इच्छुकांच्या आशाही पल्लवित झाल्या होत्या; मात्र आता चार सदस्यांचा एक पॅनेल या पद्धतीने प्रभाग रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या वाढणार की तेवढीच राहणार, हेदेखील आता येत्या महिनाभरात निश्चित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.