नवी मुुंबई आगीच्या तोंडावर
एमआयडीसीतील औद्योगिक पट्ट्यासह वाशीत सर्वाधिक नोंद
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) ः नुकताच काही दिवसांपूर्वी चर्चगेट रेल्वेस्थानकमध्ये असलेल्या एका खाद्यपदार्थाच्या स्टॉलमध्ये आग लागली होती. अशातच, ठाणे-बेलापूर मार्गावर असलेल्या ऐरोली रेल्वेस्थानकबाहेरील खाऊच्या गाड्यामधील सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणारे बहुतांश हे घरगुती सिलिंडरचा वापर करतात. याशिवाय त्यांच्याकडे आपत्कालीन अग्निसुरक्षा यंत्रणादेखील नसते, तर केमिकल कंपन्यांकडून होणाऱ्या निष्काळजीमुळे संपूर्ण औद्योगिक पट्टा गॅसवर आला आहे. मागील दीड वर्षात एक हजार एक ठिकाणी आग लागल्याची नोंद नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे झाली असल्याची माहिती विभागीय अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी दिली. तसेच सर्वाधिक आगीच्या घटना या वाशी अग्निशमन केंद्रात नोंद झाल्या आहेत; तर सर्वात कमी कोपरखैरणे विभागात झाल्या आहेत.
मागील दीड वर्षात नवी मुंबई शहरासह एमआयडीसी क्षेत्रात मोठ्या कंपन्यांना भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, औद्योगिक पट्ट्याला लागून असलेल्याच रहिवासी क्षेत्रालाही धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी तुर्भे एमआयडीसीत एका रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत दोघा कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याशिवाय २०२४ मध्ये बेलापूरमधील कुकरेजा सेंटर नामक इमारतीच्या बी विंगमधील मीटर रूमला भीषण आग लागली होती. यामध्ये अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले होते. आगीत अडकून पडलेल्या ३५ जणांना अग्निशमन जवानांकडून सुखरूप बाहेर काढले. आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणून ठाणे, बेलापूर औद्योगिक क्षेत्राची ओळख आहे. सुरुवातीच्या काळात या पट्ट्यातील सुमारे साडेतीन हजार कंपन्यांपैकी बहुतांश रासायनिक कंपन्या होत्या, मात्र कालांतराने त्यापैकी अनेक कंपन्या बंद पडल्या, तर काही स्थलांतरित झाल्या आहेत. असे असले तरीही सध्या कार्यरत असलेल्या केमिकल कंपन्यांकडून सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांवरून स्पष्ट झाले आहे. तसेच नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडलादेखील वारंवार आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
.....................
औद्योगिक पट्ट्यात आगीच्या घटना प्रत्येक महिन्याला घडत आहेत. केमिकल कंपन्यांशेजारी पुरेशी मोकळी जागा आवश्यक असतानाही एकमेकाला खेटून सर्व कंपन्या सुरू आहेत. त्यामध्ये रासायनिक कंपन्यांसह विविध कारखाने आहेत. त्यामुळे एका कंपनीला आग लागल्यास ती लगतच्याही कंपन्यांमध्ये पसरली जाते. यामुळे आगीमध्ये होणाऱ्या वित्तहानीचे प्रमाण वाढत आहे. काही ठिकाणी बंद कंपन्यांच्या जागी भंगाराचे गोडाऊन चालवले जात आहेत, तर बहुतांश कंपन्यांकडून समोरची मोकळी जागाही केमिकलचे ड्रम ठेवण्यासाठी वापरली जात आहे. तसेच एमआयडीसीमध्ये पार्किंग व्यवस्था नसल्याने केमिकल भरलेली वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात.
......................
जानेवारी ते डिसेंबर २०२४
बेलापूर-६६
नेरुळ-१३०
वाशी-१६६
कोपरखैरणे-१२१
ऐरोली-१११
एकूण-५९४
जानेवारी ते में २०२५
बेलापूर-८२
नेरूळ -८४
वाशी-९५
कोपरखैरणे.-९७
ऐरोली-४९
एकूण -४०७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.