खोपोली, ता. १६ (बातमीदार) ः शहरातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. वाहतूक कोंडी, गटारांची दुरवस्था, रखडलेली भुयारी गटार योजना, अंतर्गत रस्त्यांची दैना, कचरा संकलन व घंटागाडी वेळेत येत नसल्याने अस्वच्छता, पाणी समस्या, भाजीपाला संकुलाची दुरवस्था, गार्डन व उद्यानाकडे होत असलेले दुर्लक्ष आदी समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तक्रार करूनही प्रशासनाकडून योग्य उपाययोजना होत नसल्याने कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. नगरपालिकेवर प्रशासक राज असल्याने लोकप्रतिनिधीही नागरी समस्या सोडवण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी नसल्याने पालिकेचा पूर्ण कारभार मुख्याधिकारी व प्रशासकाच्या हातात आहे. नागरी कृती समिती, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व आपकडून आक्रमक भूमिका घेतली आहे; मात्र शहरातील मोठे राजकीय पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, भाजप, शेकाप मात्र सर्वच मुद्यांवर मूग गिळून आहेत. वर्तमान स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असून नेते व इच्छुक पदाधिकारी नगरपालिका निवडणुकांच्या प्रतीक्षेत आहेत.
खोपोली नगरपालिका क्षेत्रात शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीची (अजित पवार गट) ताकद मोठी आहे. इतर राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी-नेत्यांचा कल आमदार महेंद्र थोरवे यांना पूरक असल्याने शिवसेनेची स्थिती मजबूत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्ठावान व काठावरील पदाधिकारी असे दोन गट निर्माण झाल्याने पक्षांतर्गत धुसफूस सुरू आहे. भाजप, शेकाप व काँग्रेसची पारंपरिक ताकद अस्तित्वात असून, आरपीआय, मनसेसह आप व वंचित ही सक्रिय आहे; मात्र नागरी समस्यांवर कोणताही राजकीय पक्ष व नेता ठोसपणे भूमिका घेत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
खोपोलीतील विकासकामे खुंटली
भुयारी गटार योजना व त्याअंतर्गत येणाऱ्या अन्य योजना काही वर्षांपासून रखडली आहे. भाजीपाला मार्केट संकुल, नियोजित व्यापारी संकुल, वाहनतळ, सिटी बसस्थानक सुशोभीकरण, अद्ययावत क्रीडांगण, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आदी महत्त्वाची विकासकामे अद्याप कागदावरच आहेत. असे असले तरी अतिरिक्त कचरा संकलन कर, वाढीव पाणीपुरवठा कराने नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम नगरपालिकेकडून सुरू आहे. दैनंदिन समस्यांबाबत रहिवासी वेळोवेळी नगरपालिका कार्यालयात तक्रारी करतात; मात्र या तक्रारींकडे बघण्यास प्रशासनातील अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
प्रशासनावर दबाव टाकण्याची गरज
विविध नागरी समस्यांबाबत काँग्रेसकडून वारंवार आवाज उठवला जात आहे. पाठपुरावा करून विविध समस्या मार्गी लावण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रितपणे प्रशासनावर दबाव टाकण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया खोपोली शहर काँग्रेसचे अध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी दिली आहे. तर पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी व सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य यंत्रणा कळीचा मुद्दा बनला आहे. याबाबत पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र हर्डीकर यांनी व्यक्त केले.
खोपोली : शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये स्वच्छता पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.