रस्ता खचल्याने बेस्ट बस अडकली
सर्व प्रवासी सुखरूप; रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः गिरगाव येथील ठाकूरद्वार जंक्शनजवळ रस्ता खचल्याने पडलेल्या खड्ड्यात बेस्टची बस अडकल्याची घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. क्रेनच्या मदतीने ही बस बाहेर काढण्यात आली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून, बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.
बॅकबे आगारातून निघालेली बस सकाळी ९.२५ वाजता ठाकूरद्वार जंक्शनजवळ रस्ता खचून पडलेल्या सुमारे पाच फूट खोल खड्ड्यात अडकली. संततधार पाऊस सुरू असताना बसचे पाठीमागील चाक खड्ड्यात अडकला होते. बसमध्ये ३५ ते ४५ प्रवासी होते. नजीकच मेट्रो-३च्या कामासाठी असलेल्या क्रेनच्या मदतीने अडकलेली बस खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर ११.०० वाजण्याच्या सुमारास बस पुढे मार्गस्थ झाली. गिरगाव परिसरात मेट्रोसह विविध प्रकारची कामे सुरू असल्याने येथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असल्याने ठिकठिकाणी खड्डे पडल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यातच रस्ता खचल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
----
वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या घटनेमुळे कलानिकेतन-उजवे वळण-मेट्रो-डावे वळण-जेएसएस रोड-ठाकूरद्वार जंक्शन येथून उजवे वळण घेऊन पुढे नियोजितमार्गे आणि ठाकूरद्वार जंक्शन-उजवे वळण-जेएसएस रोड-गिरगाव चर्च, राजाराम मोहन रॉयमार्गे-चारूशीला गुप्ते चौक, एम. के. रोड अशी वाहतूक वळविण्यात आली.
-----------
मेट्रो-३ प्रकल्पग्रस्तांच्या इमारतीत पाणी शिरले
मेट्रो-३ मार्गामुळे बाधित प्रकल्पग्रस्तांसाठी एमएमआरसीएलकडून गिरगाव येथे पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि पालिकेच्या जलवाहिन्यांना गळती लागल्याने या इमारतीच्या तळमजल्यामध्ये पाणी शिरल्याची घटना घडली आहे. याबाबत एमएमआरसीएलकडे विचारणा केली असता, पुनर्वसन इमारतीच्या तळमजल्यात पाणी आल्याचे म्हटले आहे. महापालिकेच्या समन्वयाने जलवाहिन्या, गटार किंवा नाल्यांमधील गळती दुरुस्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.