२७ गावांतील समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांची भेट
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : कल्याण डोंबिवलीतील २७ गावांच्या विविध समस्यांबाबत मंगळवारी (ता. २७) गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. २७ गावे वगळल्यानंतर ग्रामपंचायतीत असलेल्या ४९९ सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत समावून घ्यावे, सावळाराम महाराज स्मारकाच्या कामाचा डीपीआर लवकर तयार करावा, त्यासाठी अतिरिक्त वास्तुविशारद राजू तायशेट्ये यांची नियुक्ती करावी, २७ गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आरोग्य केंद्रे महापालिकेत घ्यावीत, महापालिकेने कचरा संकलनासाठी नेमलेल्या खासगी कंपनीत भूमिपुत्रांनादेखील रोजगाराची संधी द्यावी, त्याचबरोबर २७ गावांतील रस्ते, गटारांच्या कामासाठी निधी द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी आयुक्त गोयल यांच्यासोबत चर्चा करून संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
आयुक्तांनी या प्रश्नांवर सकारात्मकता दर्शविली आहे. गरज पडल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही यासंदर्भात बैठक घेतली जाणार असल्याचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले. तर दोन दिवसांपूर्वी खासदार सुरेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली डोंबिवलीत झालेल्या बैठकीत डुप्लीकेट संघर्ष समिती अशी टीका केली होती. याबाबत वझे यांना विचारले असता, सुरेश म्हात्रे अध्यक्ष होऊन १० महिने झाले. १० महिन्यांनंतर बैठक घेतली, परंतु आमच्या सतत बैठका सुरू असून, लोकांच्या विकासाची कामे करीत आहोत. आमची समिती जर नकली असती तर ४९९ कामगार आमच्या बाजूने का राहिले असते, असा त्यांनी सवाल केला.
जनता आमच्यासोबत
२७ गावांतील रस्त्यांसह अनेक प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही करीत आहोत. ९०० कोटींचा कर आम्ही कमी केला. त्यामुळे जनता कोणासोबत आहे ते आम्हाला माहिती आहे. डुप्लीकेट कोण आणि खरे कोण हे लोकांना सांगायची आवश्यकता नाही. त्यांचा विश्वास आमच्यावर असल्याचे गुलाब वझे यांनी सांगितले. त्यांच्या बैठकीत राजकारण होत असल्याचे दिसून आले. स्वतंत्र नगरपालिकेची आमची भूमिका कायम आहे. आम्ही विकासासोबत असल्याचे वझे यांनी सांगितले. तर आगरी समाजासाठी कोण काम करीत आहे, हे सर्वांना माहिती असल्याचा उल्लेखदेखील त्यांनी केला. एकूणच दोन्ही संघर्ष समित्या आक्रमक झाल्याने आगामी काळात येथील राजकारण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.