उत्सव शब्दसूरांचा ध्यास मराठीचा कार्यक्रम एनसीपीएत
नवी मुंबई (वार्ताहर) : कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय, नेरूळ पुरस्कृत व अक्षरकाव्य समूह नवी मुंबई निर्मित ‘उत्सव शब्दसूरांचा ध्यास मराठीचा’ हा कवितांवर आधारित कार्यक्रम शनिवारी (ता. २८) संध्याकाळी साडेसहा वाजता चर्चगेट येथील एनसीपीए लिटिल थिएटर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे नियोजन कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्थेच्या महिला सदस्यांनी केले आहे. उत्सव शब्दसूरांचा ध्यास मराठीचा या कार्यक्रमात पल्लवी देशपांडे, क्षमा खडतकर, शीतल देशपांडे, सायली डेग्वेकर व सुप्रिया देशपांडे या कवितांचे सादरीकरण करणार आहेत. त्यांना सिंथेसायझरवर प्रमोद जाधव व तालवादक व्यंकटेश कुलकर्णी साथ देणार आहेत. या कार्यक्रमाची संहिता व निवेदन प्रज्ञा लळींगकर यांचे आहे. नवी मुंबईतील सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था ही मुंबईतील एनसीपीए थिएटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करणारी नवी मुंबईतील पहिली संस्था असल्याचे संस्थेचे कार्यवाह ललित पाठक यांनी सांगितले. हा नवी मुंबईतील कलाकारांसाठी अभिमानाचा क्षण असणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन संस्थेद्वारे करण्यात आले आहे.
.............
संतोष कुमार झा यांचा सन्मान
नवी मुंबई (वार्ताहर) : साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित आशीर्वाद संस्थेने आपल्या ५६ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा भव्य सोहळा नुकताच मुंबईतील अजंता हॉल येथे साजरा केला. या कार्यक्रमात कवी आणि कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांना आशीर्वाद राजभाषा रत्न या अलंकाराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखक राजेश विक्रांत यांच्या ‘आमची मुंबई २’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल, अग्रवाल संमेलन ठाण्याचे अध्यक्ष सुभाषचंद्र अग्रवाल, प्रसिद्ध अभिनेते विष्णू शर्मा, ज्येष्ठ पत्रकार भुवेंद्र त्यागी, तसेच ज्येष्ठ साहित्यिक आचार्य पवन त्रिपाठी उपस्थित होते. आशीर्वाद संस्थेचे संचालक उमाकांत बाजपेयी, अध्यक्ष बृजमोहन अग्रवाल व सहसंचालिका नीता बाजपेयी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हृदयेश मयंक, विमल मिश्र, रहमान अब्बास, सुनील मेहरोत्रा, विवेक अग्रवाल, हरी मृदुल, जितेंद्र दीक्षित, शराफत खान, प्रभाकर पवार आणि नितीन साळुंखे या मुंबईतील नामवंत पत्रकार व साहित्यिकांनी विशेष अतिथी म्हणून सहभाग नोंदवला. या संस्मरणीय कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी आपापले तीन मिनिटांचे आत्मकथन सादर करून एक नवीन प्रेरणादायी परंपरा निर्माण केली.
..............
जुईनगर, नेरूळमध्ये उत्सवानिमित्त मंडळांची लगबग
जुईनगर, ता. २४ (बातमीदार) : आपल्या मराठी परंपरेत आषाढी एकादशीने सण-उत्सवांना सुरुवात होते. आषाढी एकादशीबरोबरच गोपाळकाला व गणेशोत्सवाची चाहूल गोपाळांना आणि गणेशभक्तांना लागलेली असते. त्यामुळे सर्वत्र तरुणाईची लगबग सुरू झाली असून गणेशभक्तांच्या बैठकी आणि गोपाळांच्या सरावाला सुरुवात झाली आहे.
नेरूळ येथील एकवीरा कला क्रीडा मंडळाच्या गोविंदा पथकाचा सराव शुभारंभ नुकताच पार पडला. गेली १७ वर्षांपासून मंडळ कार्यरत असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई व पनवेल परिसरात अनेक पारितोषिके मंडळाने पटकावलेली आहेत. एकूण पाचशे गोविंदा या पथकाचे सदस्य असून शंभरहून अधिक गोविंदा नेरूळ येथील बांचोली मैदानात प्रतिदिन सराव करतात. देवनाथ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाचे कामकाज चालते. नवी मुंबईत ठिकठिकाणी गणेशोत्सवाच्या बैठकादेखील सुरू झाल्या आहेत. नुकतीच नेरूळ येथील नवयुग उत्सव मित्र मंडळाच्या गणेशोत्सव नियोजनाची बैठक पार पडली. बैठकीत नवीन कमिटी स्थापन करण्यात आली. तर अध्यक्षपदी अजित कदम, उपाध्यक्षपदी अजित धोंडकर तर खजिनदारपदी निखिल पारखे यांची निवड झाली आहे. या वेळी पावती पूजन पार पडले. २९ जूनला पाद्यपूजन तर १० ऑगस्ट रोजी आगमन सोहळा निश्चित करण्यात आला आहे. वर्गणी निश्चित करणे, टी-शर्ट छपाई, आगमनासाठी वाद्यवृंद निश्चित करणे आदी कामांसाठी मंडळाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. या वेळी मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार बजरंग खैरे, एल. के. शिंदे, तुकाराम कदम, सुशांत मतकर, महेंद्र डोके, दिनेश टावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
.......
प्रवास व पर्यटन सर्वेक्षणांसाठी प्रशिक्षण शिबिर
वाशी (बातमीदार) ः भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, फील्ड ऑपरेशन्स डिव्हिजन, क्षेत्रीय कार्यालय मुंबई यांच्या वतीने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील सीजीओ कार्यालयात २३ ते २५ जून या कालावधीत प्रवास व पर्यटन सर्वेक्षणांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या ८०व्या फेरीच्या अनुषंगाने घेतले जात आहे. ज्यामध्ये प्रवास व पर्यटन क्षेत्रातील दोन महत्त्वाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहेत. ही दोन सर्वेक्षणे म्हणजे घरगुती पर्यटन खर्च आणि राष्ट्रीय घरगुती प्रवास सर्वेक्षण याअंतर्गत होणार आहे. ही सर्वेक्षण जुलै २०२५ ते जून २०२६ या कालावधीत संपूर्ण देशभरात होणार आहेत. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन बेलापूर येथील कार्यालयात मुंबईच्या उपमहासंचालक व प्रमुख सुप्रिया रॉय यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी सुप्रिया रॉय म्हणाल्या, की पर्यटन व प्रवास क्षेत्रातील उच्च दर्जाच्या, विश्वासार्ह आकडेवारीच्या महत्त्वावर भर दिला जात आहे. नागरिकांनी या सर्वेक्षण कार्यात भरभरून सहकार्य करावे, या सर्वेक्षणांच्या यशस्वितेचा पाया नागरिकांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीच्या गुणवत्तेवर आधारित आहे. या प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील सुमारे १०० क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले आहेत. सर्वेक्षणाच्या संकल्पना, प्रक्रिया व फील्ड पद्धतींमध्ये केंद्र व राज्य संस्थांमध्ये एकसंधता राखण्यासाठी या सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.