भिवपुरी स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था
डबक्यांचे स्वरूप; प्रवाशांमध्ये नाराजी
कर्जत, ता. २५ (वार्ताहर) ः मध्य रेल्वेवरील कर्जतच्या आधी येणाऱ्या भिवपुरी रेल्वेस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते; मात्र स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून साचलेल्या पाण्यामुळे प्रवासी आणि पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागतो. डिकसळ गावात जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जागोजागी तळी साचली आहेत. निसर्गरम्य भिवपुरी परिसरात दर शनिवार-रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक येतात; मात्र खराब रस्त्यामुळे त्यांचा हिरमोड होत आहे.
स्थानिक ग्रामस्थ, कामगार आणि विद्यार्थी यांच्यासाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग वर्षानुवर्षे दुरवस्थेत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली असून पावसात ते अधिक धोकादायक ठरत आहेत. भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेने यापूर्वी अनेक वेळा संबंधित रेल्वे प्रशासन, ग्रामपंचायत, आमदार आणि खासदारांना समस्यांचे निवेदन दिले आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा संघटनेचा आरोप आहे.
अपघाताची शक्यता
दररोज हजारो प्रवाशांची या रस्त्यावर वर्दळ असते. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्यास अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने डागडुजी करून तो सुस्थितीत करावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा प्रवासी संघटनेकडून देण्यात आला आहे.
-----------------
लालफितीत अडकला चणेरा-गायचोळ रस्ता
ग्रामस्थांच्या मागणीकडे २५ वर्षांपासून दुर्लक्ष
रोहा, ता. २५ (बातमीदार) ः तालुक्यात चणेरा भागातील गायचोळ गावाकडे जाणारा रस्ता जवळपास २५ वर्षांपासून दुर्लक्षित आहे. राजकीय इच्छाशक्तीअभावी प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींकडे अनेकदा उंबरठे झिजवले आहेत; मात्र अद्याप परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
चणेरा-गायचोळ गावातील रस्त्याची दैना झाली असून २५ वर्षांपासून डागडुजीसाठी एक रुपयाही खर्ची घातलेला नाही. गायचोळ गाव डोंगर आणि दुर्गम भागात असल्याने पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून येणाऱ्या पाण्यासह चिखल, माती वाहून येते. त्यामुळे ग्रामस्थांना खड्डे आणि चिखलातून पायपीट करावी लागते. खांबेरे ग्रामपंचायत हद्दीत येणारा हा रस्ता रोहा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. विशेष म्हणजे, रस्त्याचा काही भाग मुरूड वन विभाग तर काही भाग रोहा वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने दोन्ही वन विभागाच्या कार्यालयांच्या परवानगीशिवाय रस्त्याची दुरुस्ती अथवा नवीन रस्त्याचे काम होऊ शकत नाही.
नवीन रस्ताच्या कामासाठी मुरूड आणि रोहा वन विभागाच्या कार्यालयांत रोहा सार्वजनिक कार्यालयातून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे; मात्र दोन्ही विभागाने मंजुरी न दिल्याने लालफितीत अडकला आहे. एकंदरीत वन विभागाच्या अटी-शर्तींचा फटका ग्रामस्थांना बसतो आहे.
बिरवाडी ते गायचोळ रस्ता नव्याने तयार करण्यासंदर्भात सरपंचांची भाजपचे खासदार धैर्यशील पाटील यांना ४ जूनला पत्र दिले आहे. रस्त्यालगतच बिरवाडी किल्ला असून शेकडो पर्यटक या ठिकाणी येतात; मात्र चिखलातून वाट काढावी लागत असल्याने त्यांची नाराजी आहे. रस्त्याच्या कामाकडे स्थानिक आमदारांनी प्राधान्याने लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
वनविभागातील अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार
बिरवाडी-गायचोळ गावातील अंतर्गत रस्त्याचा काही भाग मुरूड तर काही भाग रोहा वन विभागाच्या हद्दीत येतो. दोन महिन्यांपूर्वी रोहा वन विभाग तर महिनाभरापूर्वी मुरूड वन विभागाच्या कार्यालयात नवीन रस्ता मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे; मात्र अद्याप एकाही कार्यालयातून मंजुरीचे पत्र मिळालेले नाही. मुरूड वन विभागाच्या कार्यालयात नवीन अधिकारी रुजू झाले आहेत. काही दिवसांत त्यांची आणि रोहा वन विभाग कार्यालयातील अधिकारी वर्गाची भेट घेऊन लवकरच कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती रोहा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील उपअभियंता अरुण पाटील यांनी दिली.
रोहा : बिरवाडी-गायचोळ रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.