उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : मी सिंधी असल्यामुळेच त्रास दिला जात आहे, असे विधान भाजप आमदार कुमार आयलानी यांनी समाज माध्यमांवर केल्यानंतर पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी थेट आमदार आयलानी यांना ‘उल्हासनगरातील सर्व मतदारांची माफी मागा; अन्यथा आमदारकीचा राजीनामा द्या’, अशी परखड मागणी केली आहे. त्यामुळे उल्हासनगर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली असून, पक्षातील फाटाफूट चव्हाट्यावर आली आहे.
आमदार आयलानी सध्या शहाड परिसरात उल्हास नदीच्या काठावर सुरू असलेल्या घाट बांधकामाच्या वादात अडकले आहेत. रिजेन्सी अंटॅलिया कॉम्प्लेक्सजवळ सरकारी निधीतून घाट बांधण्याचे काम सुरू केले जात आहेत. या कामाबाबत हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांनी लघुपाटबंधारे विभागाकडे तक्रार दाखल केली होती. विभागाच्या पाहणीनंतर बांधकाम नदीपात्रात सुरू असल्याचे स्पष्ट होताच अधिकाऱ्यांनी बांधकाम पाडण्याची नोटीस बजावली आहे. याच पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या आयलानी यांनी समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त करत, ‘मी सिंधी असल्यानेच माझ्याविरोधात कारवाई होत आहे. एखादा मराठी आमदार असता, तर त्याच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत झाली असती का? असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांवर निशाणा साधला.
त्यांच्या या वक्तव्याचा जोरदार प्रतिवाद करत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी आयलानी यांना घरचा आहेर दिला. ते म्हणाले, ‘आयलानी यांना केवळ सिंधी मतदारांनी नव्हे, तर सर्व समाजातील नागरिकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे अशा विभाजनवादी वक्तव्याने उल्हासनगरातील समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न न करता त्यांनी त्वरित जनतेची माफी मागावी’. या आरोप-प्रत्यारोपामुळे सध्या उल्हासनगरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपमध्ये अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. विशेषतः निवडणुकीपूर्वीच पक्षातील नेत्यांमध्ये अशी उघड नाराजी दिसून येत असल्याने आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.