पेण, ता. २५ (वार्ताहर) : शहरातील चिंचपाडा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे याकरिता छावा संघटना तसेच इतर शिवप्रेमी संघटनेच्या माध्यमातून सोमवारी (ता. २३) पेण नगरपालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत महाराजांचे स्मारक ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचे लेखी पत्र नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. शहराचे सुशोभीकरण होत असताना, छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे, याकरिता दोन-तीन वर्षांपासून छावा संघटना तसेच इतरही शिवप्रेमी संघटनांनी अनेकदा नगरपालिका प्रशासनाला निवेदने दिली आहेत, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने छावा संघटनेने चिंचपाडा मार्गावरील शांती निकेतन सोसायटीसमोर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा चौक उभारला आणि त्याच ठिकाणी स्मारक व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार सरकारकडून प्रस्ताव मंजूर होऊनही कामास विलंब होत असल्याने संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत ऑक्टोबरपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी पत्र मुख्याधिकारी यांनी दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले. या वेळी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, ताराराणी ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा वंदना मोरे, उपाध्यक्षा कविता खोपकर, सह्याद्री प्रतिष्ठान कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, काँग्रेसच्या नंदा म्हात्रे, राम ठाकूर, अश्विनी ठाकूर, अभिमन्यू म्हात्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
ठेकेदारामुळे कामास विलंब
छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावे याकरिता छावा संघटना तसेच इतरही शिवप्रेमी संघटनांकडून निवेदने आली होती. स्मारकाच्या कामास ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे विलंब झाला आहे. त्यामुळे पुढे ए. जी. इंटरप्राईजेस ठेकेदाराला नगरपालिकेकडून कोणताही ठेका देण्यात येणार नाही, तसे पत्रही त्याला देण्यात आले आहे. ऑक्टोबरपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- जीवन पाटील, मुख्याधिकारी, पेण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.