माळरानावर फुलवले नंदनवन
वन विभागाकडे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून वृक्षांचे हस्तांतर
खालापूर, ता. २५ (बातमीदार) ः नुकतेच जागतिक पर्यावरणदिनानिमित्त राज्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले. त्या अनुषंगाने औषधी, बहुगुणी अशा सुमारे ४८२ वृक्षांची लागवड आणि चार वर्षे सलग संवर्धन केल्यानंतर डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाकडून वन विभागाकडे त्यांचे हस्तांतरण करण्यात आले आहे. अशा प्रकारे वन विभागाच्या माळरानावर नंदनवन फुलल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
सामाजिक बांधिलकीतून प्रतिष्ठानतर्फे सातत्याने विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात. खालापूर तालुक्यातील श्री सदस्यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ५ जुलै २०२१ रोजी वन परिक्षेत्र असलेल्या हाळ बुद्रूक हद्दीत वृक्षलागवड केली होती. खडकाळ उजाड माळरान असलेल्या वन विभागाच्या जागेत जवळपास ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. गिरीपुष्प, उंबर, करंज कडुलिंब, आकाश शेवगा, आवळा, गोड चिंच, जांभूळ, बाभूळ, बेल, शिसव, विलायती चिंच, सिताफळ, पेरू टाकळा, काशीद, आपटा यासारख्या जवळपास ५० वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची लागवड तालुक्यातील श्री सदस्यांनी मिळून केली होती. वृक्षलागवडीनंतर संवर्धनासाठी प्रतिष्ठानतर्फे योग्य नियोजन करण्यात आले होते. वेळोवेळी खत, पाणी तसेच आवश्यकतेनुसार वृक्षाभोवती ग्रीन नेट कुंपण करून संगोपन करण्यात आले. उन्हाळ्याच्या दिवसात तालुक्यातील श्री सदस्यांकडून वेळोवेळी पाणी देणे तसेच मानवनिर्मित वणव्यापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी सुके गवत काढणे यासारखी कामे नित्यनेमाने करीत होते. त्याचाच परिणाम चार वर्षांनंतर दिसून येत असून, खडकाळ माळरानावर निसर्ग बहरल्याने अगदी १० फुटांपासून ३५ फूट उंचीपर्यंत वृक्षांची वाढ झाली आहे. झाडांची पाळेमुळे घट्ट रुजल्यानंतर वृक्षांचे हस्तांतरण वन परिक्षेत्राधिकारी खालापूर राजेंद्र पवार यांच्याकडे करण्यात आले आहे.
....................
उन्हाळ्यात झाडांना पाणी मिळावे यासाठी हाळ आदिवासीवाडी येथे असलेल्या विहिरीचा फायदा झाला. ही विहीर अनेक वर्षे मृतावस्थेत होती. त्यातील जलसाठा वापरला जात नसल्याने पाण्याला दुर्गंधी येत होती. श्री सदस्यांनी विहिरीची सफाई करून त्यातील पाणीसाठा वापरात आणल्याने तिचे पुनर्भरण झाले आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांनी वृक्षलागवडीनंतर संगोपनदेखील केल्यास खडकाळ भागात नंदनवन फुलू शकते, हे कृतीतून दाखवले आहे.
...................
वृक्षलागवडीनंतर संगोपन होणे महत्त्वाचे असते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचे कार्य अलौकिक आहे. पर्यावरणासाठी झालेले काम पुढच्या पिढीसाठीदेखील मोलाचे ठरणार आहे. -राजेंद्र पवार, वन परिक्षेत्र अधिकारी, खालापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.