शासकीय अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक : तिघांना अटक
रक्कम क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून परदेशात पाठवली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : डिजिटल अरेस्ट गुन्ह्यात फसवणुकीची रक्कम क्रिप्टो करन्सीच्या (वीडीए) माध्यमातून परदेशात पाठविणाऱ्या तीन जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात ठाणे शहर पोलिसांच्या सायबर सेलला यश आले आहे. याप्रकरणी मुंबईतील सत्कार पतपेढील चेअरमन किशोर बन्सीलाल जैन (वय ६३), गारमेंट व इमिटेशन ज्वेलरी व्यावसायिक महेश पवन कोठारी (वय ३६) आणि कॉस्मेटिकचे व्यावसायिक धवल संतोष भालेराव (वय २६) यांना गुरुवारी (ता. १९) अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सायबर गुन्हेगार हे शासकीय अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना डिजिटल अरेस्टची धमकी देत ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे करीत आहेत. ठाणे नगर पोलिस ठाण्यात माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाअन्वये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार फिर्यादींना मोबाईलवर फोन करून त्यांनी डीएचएल कंपनीचे कुरिअर पार्सल पाठविल्याचे सांगत संपर्क केला. या फोनमध्ये त्यांनी पाठविलेले पार्सल जप्त झाले असून, यात एक लॅपटॉप, १४० ग्रॅम अमली पदार्थ, थाई पासपोर्ट, तीन क्रेडिट कार्ड, चार किलो कपडे असल्याचे सांगून या पार्सलशी तुमचा संबंध नसल्यास पोलिसांना कळवा, असे सांगितले. तर दुसऱ्या मोबाईलवरून फिर्यादींशी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. यात सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादींना वेळावेळी कॉल करून डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगितले आणि फिर्यादींना बनावट कागदपत्रे पाठवून त्याच्या बँक खात्यातील रक्कम आरोपींच्या बँक खात्यावर तपासणीकरिता वळती करण्यास भाग पाडले. तसेच आरोपींनी एकूण तीन कोटी चार लाख रुपये स्वतःच्या वेगवेगळ्या लाभधारक बँक खात्यावर वळती करून घेतली आणि ती रक्कम फिर्यादी यांना परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
अद्ययावत कार्यप्रणालीचा वापर
या गुन्ह्याचा तपास सध्या सायबर पोलिस करीत आहेच. या प्रकारचे गुन्हे करणारी टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असून, आरोपी तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत कार्यप्रणालीचा वापर करीत असल्याचे निष्पन्न झाले. तपासाधीन गुन्ह्यातील फिर्यादींची फसवणूक झालेल्या रकमेपैकी ८२ लाख ४६ हजार रुपयांची रक्कम आरोपींनी यूएसडीटीद्वारे परदेशात पाठविले. त्यानंतर त्या तिघांना अटक करण्यात आली आहे. ते पोलिस कोठडीत असून, पुढील तपास सायबर सेल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश बारके हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.