वैध मापनशास्त्र विभागाला मराठीचे वावडे
वजनमाप प्रमाणपत्र इंग्रजीत; व्यापाऱ्यांना अर्ज करताना अडचणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला असून मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी शिक्षणासह लोकव्यवहारातदेखील मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे; मात्र दुसरीकडे वैध मापनशास्त्र विभागामार्फत देण्यात येणारे परवाने व वजन माप पडताळणी प्रमाणपत्र काही मराठी तर, काही इंग्रजीत देण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणअंतर्गत येणाऱ्या वैध मापनशास्त्र विभागालाच मराठीचे वावडे असल्याचे दिसून येत आहे.
मराठी भाषेला ज्ञानभाषा व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षण, बँक, विधी व न्याय व्यवहार, वित्त व उद्योगजगत प्रशासनात मराठी भाषेची अंमलबजावणी करण्यासदेखील सुरुवात करण्यात आली आहे. अनेक प्रशासकीय व्यवहारात मराठीचा वापरदेखील करण्यात येत आहे. असे असताना, दुसरीकडे वैध मापनशास्त्र विभागामार्फत देण्यात येणारा परवाना व वजन माप पडताळणी प्रमाणपत्रावरील उपभोगकर्त्याचे नाव व पत्ता वजन मापाचा तपशील इंग्रजी भाषेत देण्यात येत असतो. तसेच वजन माप पडताळणी अर्ज करताना अनेक रकाने मराठी भाषेत असणे गरजेचे आहे. याविरोधात वजन माप परवानाधारकांची संघटना ठाणे वजन माप असोसिएशनच्या वतीने जानेवारी २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना निवेदन देत वजन माप पडताळणी प्रमाणपत्र पूर्णत: मराठीत करण्याची मागणी केली. त्यानंतर पुन्हा २५ फेब्रुवारीलादेखील पुन्हा स्मरणपत्र शासनाला असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आले; मात्र त्यावर शासनाकडून अद्यापही ठोस कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वैध मापनशास्त्र विभागाला मराठीचे वावडे तर नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
बेमुदत धरणे आंदोलन
वजन माप परवानाधारकांची संघटना ठाणे वजन माप असोसिएशनच्या वतीने वजन माप पडताळणी प्रमाणपत्र पूर्णत: मराठीत करावे, या मागणीसाठी मागील दीड वर्षापासून पाठपुरवा करण्यात येत आहे. तसेच सरकारला दोनदा निवेदनदेखील देण्यात आले; मात्र सरकारकडून याबाबत ठोस उपाययोजना केलेली नाही. वैध मापनशास्त्र गिरगाव विभागातील निरीक्षक सुनील शेळके यांच्या मनमानी व नियमबाह्य कामकाजाची पुराव्यासह तक्रार देण्यात आली असून त्याची चौकशी करून शेळके यांचे तत्काळ निलंबन करावे, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने आली, तसेच मागण्या मान्य न झाल्यास ४ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.