बेकरींच्या पर्यावरणपूरक इंधनासाठी कालबद्ध कार्यक्रम
पालकमंत्री आशीष शेलार यांचे पालिकेला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : स्थानिक बेकरी या कोळसा, डिझेल तसेच लाकडाचा वापर करून चालवण्यात येत आहेत. त्या लवकरात लवकर पर्यावरणपूरक इंधनाचा वापर करून चालवल्या जातील, यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन एक कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा. तशी एक योजना तयार करावी, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशीष शेलार यांनी बुधवारी (ता. २५) महापालिकेला दिले.
मुंबईतील होणारे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत असून मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी काही उपाययोजना न्यायालयानेही सुचवल्या आहेत. मुंबईतील प्रदूषण करणाऱ्या बेकरींचा विषय मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असून ९ जानेवारी रोजी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ९ जुलैपर्यंत मुंबईतील प्रदूषण करणाऱ्या बेकरींना पर्यावरणपूरक इंधनामध्ये बदलण्याचे निर्देश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. त्यादृष्टीने प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिका याबाबत काम करीत आहे. याबाबतची आढावा बैठक मंत्रालयातील पालकमंत्री आशीष शेलार यांनी घेतली. या बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा, अमित सैनी, अभिजित बांगर आणि महापालिका तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
..
३५३ बेकरी पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक
मुंबईत परवानाप्राप्त एकूण १,०६४ बेकरींपैकी ४९० बेकरी सध्या बंद अवस्थेत आहेत, तर उर्वरित ५७४ बेकरींपैकी २२१ बेकरींनी पर्यावरणपूरक इंधन वापरण्यास सुरुवात केली होती. उरलेल्या ३५३ बेकरी कोळसा, लाकूड किंवा डिझेल, पेट्रोलवर चालवल्या जात होत्या. ज्या पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने ९ जानेवारीला दिलेल्या निर्देशानुसार ९ जुलै २०२५ पर्यंत या सर्व बेकरींना पर्यावरणपूरक इंधनामध्ये रूपांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत ७५ बेकरींनी पर्यावरणपूरक इंधन वापरण्यास सुरुवात केली असून १५० बेकरींच्या रूपांतराची प्रक्रिया सुरू आहे; मात्र १३२ बेकरींचे रूपांतर अद्यापही प्रलंबित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.