शहापूर, ता. ३० (वार्ताहर) : तालुक्याच्या विकासाला चालना देणारी कामे मंजूर केल्याचा दावा कपिल पाटील यांनी केला आहे. विकासकामांवरून खासदार सुरेश म्हात्रे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यात आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
शहापूर येथील भाजपच्या संकल्प सभेच्या कार्यक्रमात खासदार सुरेश म्हात्रे यांचा नामोल्लेख टाळून, एक वर्षात १० रुपयांचेही काम लोकसभा मतदारसंघात झाले नसल्याचा आरोप माजी मंत्री कपिल पाटील यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना १० वर्षांत कामाचा अहवाल दिला नाही, त्यांनी मला विचायचे काय काम, असा पलटवार सुरेश म्हात्रे यांनी शहापूर येथे केला होता. तसेच शहापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजूर केलेल्या भावली धरणावरील नळपाणी योजनेतील ठेकेदारांची देयके मंजूर करताना टक्केवारी घेतल्याचा सनसनाटी आरोप करून खळबळ उडवून दिली होती. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांनी विविध कामांचा पाढा वाचला.
--------------------------------------
केलेल्या कामांची उजळणी
वासिंद येथे रेल्वेचा आरओबी, कलमगाव येथे अंडरपास शहापूर-मुरबाड-खोपोली नवा राष्ट्रीय महामार्ग, वासिंद आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत, उंबरमाळी, तानशेत येथे रेल्वेस्थानक, रोजगार हमी योजनेअंतर्गत ३५ गावांना ग्रामपंचायत कार्यालयांच्या नव्या इमारती, शहापूर ते डोळखांब तसेच किन्हवली ते सरळगाव रस्ता, माहुली किल्ला परिसरात पर्यटन सुविधा, उंबरमाळी व कसारा रेल्वेस्थानकांदरम्यान मोखावणे आणि मुंबई-आग्रा मार्ग यांना जोडणारा भुयारी मार्ग, आसनगाव रेल्वेस्थानकात नवा पादचारी पूल, नवे तिकीट कार्यालय, प्रधानमंत्री आदर्श ग्राम विकास योजनेतून ४४ गावांमध्ये कामे, खर्डी रेल्वेस्थानकात पादचारी पूल, तिकीट कार्यालय आणि वायफाय प्रवासी सुविधा, कसारा रेल्वेस्थानकाचा विकास व प्रवासी सुविधांची कामे केल्याचा दावा पाटील यांनी केला.
---------------------------------------
ठेकेदारांविरुद्ध आमदारांचे मौन
शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत शहापूर व मुरबाड तालुक्यांतून नागरिकांच्या तक्रारी आहेत. शहापूर तालुक्यात अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे; परंतु मुरबाड आणि शहापूर मतदारसंघातील आमदार ठेकेदरांविरुद्ध का बोलत नाहीत, असा प्रश्न कपिल पाटील यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.