भाईंदर, ता. ३० (बातमीदार) : महसूल विभागाकडून वन विभागाकडे हस्तांतर झालेल्या जमिनींचे सॅटेलाइट सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात वन विभागाच्या जमिनींची हद्द मिठागरांच्या जमिनी दाखवल्याने मीठ उत्पादकांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रार केली आहे.
भाईंदर पश्चिमेतील मिठागरांच्या जमिनीवर स्थनिक मीठ उत्पादक पिढ्यानपिढ्या मीठाचे उत्पादन घेत आहेत. या मिठागरांच्या मालकी हक्कावरून मीठ उत्पादक तसेच प्रशासन यांच्यात संघर्ष न्यायप्रविष्ट आहे. मिठागरांच्या जमिनींवर वन विभागाकडून हद्द दाखवण्यात आला आहे. वन विभागाच्या या घुसखोरीमुळे पिढ्यानपिढ्या मीठ पिकवणाऱ्या मीठ उत्पादकांवर हा अन्याय असल्याची भावना उत्पादकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात छोटे शिलोत्री सेवा संघाच्या नेतृत्वाखाली मीठ उत्पादकांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला आहे. याचबरोबर मिरा-भाईंदर शहरातील मलमूत्र तसेच सांडपाणी प्रक्रियेशिवाय खाडीत सोडले जात असल्याने थेट परिणाम मीठ उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलनिस्सारण केंद्र सुरू करण्यात यावे, असे निर्देश मिरा-भाईंदर पालिकेला देण्याची मागणी वनमंत्र्यांकडे केली आहे.
------------------------------------------------
नोटिशीशिवाय सर्वेक्षण
मिरा-भाईंदरमधील महसूल विभागाच्या मालकीच्या कांदळवन असलेल्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. त्यांची कत्तलदेखील होत असते. यासाठी महसूल विभागाने कांदळवनाच्या सर्व जागा संरक्षित वन घोषित करून वन विभागाकडे हस्तांतर केल्या आहेत. या जागा ताब्यात घेताना वन विभागाकडून जागांचे सॅटेलाइट सर्वेक्षणातून जागांच्या हद्दी निश्चित केल्या जात आहेत, मात्र मीठ उत्पादकांना कोणत्याही नोटिशीशिवाय सर्वेक्षण केले जात असल्याचे मीठ उत्पादक छोटे शिलोत्री सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली.
--------------------------------------
वन विभागाकडून अडवणूक
पावसाळ्यात मीठ उत्पादन पूर्णपणे बंद असते. या काळात मिठागरांकडे जाणाऱ्या रस्त्यांची डागडुजी केली जाते. त्याचप्रमाणे खाडीकडून मिठागरांकडे येणाऱ्या पाण्याच्या मार्गिकांचीही दुरुस्ती केली जाते, मात्र त्यासाठी आवश्यक जेसीबी यंत्रे, राडारोडा यासाठी वन विभागाकडून अडवणूक केली जात असल्याची माहिती पाटील यांनी दिली. यासंदर्भात मीठ उत्पादकांच्या शिष्टमंडळाने वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.