अलिबाग, ता. २ (वार्ताहर) ः राज्यातील सर्व गावांमध्ये हवामानविषयक अचूक माहिती मिळावी तसेच शेतकऱ्यांना हवामानावर आधारित कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शन मिळावे यासाठी विंड्स (हवामान माहिती नेटवर्क डाटा सेंटर) प्रकल्पांतर्गत राज्यातील महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. आता गावागावांत या केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. रायगड जिल्ह्यात सध्या ६८ केंद्रे कार्यान्वित असून, एक केंद्र नादुरुस्त असल्याने बंद आहे, तर आणखी १२ केंद्रांसाठीचा जिल्हा कृषी विभागाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
रायगडातील शेती पूर्णपणे पावसाचे प्रमाणे, हवामानावर अवलंबून आहे. अनेकदा अवकाळी पाऊस, दुष्काळ, पूर यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या केंद्रांद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची माहिती प्राप्त होते. ही माहिती, मदत व पुनर्वसन विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर नागपूर, सर्व कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि इतर संशोधन संस्था यांद्वारे वापरण्यात येते. तसेच पंतप्रधान पीक विमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना इत्यादी योजनांचा लाभ देण्यासाठीही तिची आधार घेतला जातो. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांची या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सेवा पुरवठादार संस्था म्हणून नियुक्ती केली आहे.
रायगड जिल्ह्यात सध्या ६८ ठिकाणी अशी केंद्रे कार्यान्वित असून, एक बंद आहे, तर आणखी १२ केंद्रांसाठीचा प्रस्ताव जिल्हा कृषी विभागाकडून पाठविण्यात आला आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यात आठ, मुरूडमध्ये तीन, पेणमध्ये पाच, पनवेलमध्ये सात, उरणमध्ये तीन, कर्जतमध्ये सात, खालापूरमध्ये चार, रोह्यात पाच, सुधागडमध्ये तीन, माणगावात पाच, तळा तालुक्यात दोन, महाडमध्ये सात, पोलादपूरमध्ये तीन, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात तीन ठिकाणी हे स्वयंचलित हवामान केंद्र सध्या सुरू आहे. ग्रामपंचायत स्तरावर केंद्रांची उभारणी झाल्यास दुष्काळ, आग, पूर, गारपीट, ढगफुटी, थंडीची लाट, कडाक्याची थंडी आदी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामानविषयक माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येणार आहे.
रायगड जिल्ह्यात एकूण ८१ केंद्रे कार्यान्वित असणे अपेक्षित आहेत. सध्या ६९ ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. त्यातील एक बंद आहे. उर्वरित १२ ठिकाणी केंद्रे उभारणीसाठीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला आहे. त्याची अंलबजावणीही लवकरच होईल. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
- वंदना शिंदे, कृषी अधीक्षक, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.