मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
रोहा, ता. ६ (बातमीदार) ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा वरचा येथील बंदे अली शाह बाबा दर्गा परिसरात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षरोपण कार्यक्रम पार पडला. या वेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, माजी उपाध्यक्ष महेंद्र गुजर, समीर सकपाळ, शहरातील माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
.....................
रोह्यात ‘खासदार श्री २०२५’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन
रोहा (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांच्या ७०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ‘खासदार श्री २०२५’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रोहा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी गटनेते महेंद्र गुजर यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष अमित उकडे यांनी दिली. या वेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवार, ११ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता रोहे शहरातील भाटे सार्वजनिक वाचनालयात या स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धेत ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७०किलो आणि खुला गट असणार आहे. त्याचप्रमाणे रोहा टॉप टेन, मेन फिजिक टॉप टेन अशा पद्धतीने या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमित उकडे (९७६२२५११३३), सागर भोबड (९९७५८६०१२३) यांच्याशी संपर्क साधावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
..............
गावठी दारूविरोधात रोहा पोलिसांची धडक कारवाई
रोहा, ता. ६ (बातमीदार) ः गावठी दारूविरोधात रोहा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. तालुक्यातील सारसोली टिटवी जंगल परिसरातील एका ओहोळाच्या ठिकाणी बेकायदा गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती रोहा पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, शुक्रवार (ता. ४) रोजी सायंकाळी पोलिसांनी धाड टाकून गावठी दारूमाफियांविरोधात धडक कारवाई केली. या वेळी गावठी दारू उद्ध्वस्‍त करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळी हातभट्टीसाठी लागणारे रसायन, १४ प्लॅस्टिकच्या टाक्या, चार लोखंडी टाक्या अशा एकूण १८ टाक्यांमध्ये ३,१५० लिटर गूळ रसायनमिश्रित आणि इतर साहित्य असा एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
............
रोह्यात मोफत डायलिसिस सेवेचे लोकार्पण
रोहा (बातमीदार) ः रोह्यात डायलिसिस सेवा सुरू व्हावी, अशी मागणी रुग्णांसह नातेवाइकांकडून करण्यात येत होती. या मागणीच्या अनुषंगाने रोह्यातील उपजिल्हा रुग्णालयात डायालिसिस मशीनद्वारे उपचार उपलब्ध झाले आहेत. या मोफत डायलिसिस सेवेचे लोकार्पण शनिवारी (ता. ५) सायंकाळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा रुग्णालय निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण शिंदे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे आदी सामाजिक कार्यकर्ते, रुग्णांचे नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
................................
विठ्ठल विठ्ठल गजरात पोयनाड परिसर दंग
पोयनाड, ता. ६ (बातमीदार) : रविवारी देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त अलिबाग तालुक्यातील पोयनाड परिसरात ‘विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ या गजरात परिसरातील भाविक दंग झाले होते. पोयनाड परिसरातील विविध गावांमधील विठ्ठल-रखुमाई मंदिरांत भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटे श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला विधिवत अभिषेक करण्यात आला. यानिमित्त आरती, भजन, हरिपाठ यासारखे कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. ज्यांना पंढरपूर येथे जाणे शक्य नाही त्यांनी आपापल्या गावांमध्ये खांद्यावर पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ अशा गजरात टाळमृदंगाच्या साथीने छोटेखानी दिंडीचे आयोजन केले होते. पोयनाडजवळील चरी कोपरपाडा या गावात वारकरी बांधव व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात दिंडीचे आयोजन केले होते. सायंकाळी विविध ठिकाणी भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध ठिकाणी भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त अनेकांचा उपवास असल्याने साबुदाणा वडा, रताळी, वेफर्स असे उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी होती. हा आषाढी एकादशी सोहळा पोयनाड परिसरातील पोयनाड, पेझारी, शहाबाज, शहापूर, कोपर, चरी, हाशिवरे, कुर्डुस, श्रीगाव, ताडवागळे, देहेन या गावांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
................
पेणमध्ये गतिमंद मुलांनी काढली दिंडी
पेण, ता. ६ (बातमीदार) ः रामवाडी येथील आय डे केअर संस्था संचालित गतिमंद मुलांच्या माध्यमातून आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती. त्यामध्ये पूर्व प्राथमिक वर्गातील उषा भोईर ही रुक्मिणी तर हर्ष तेलंगे याने विठ्ठलाची वेशभूषा केली होती. या वेळी पेण येथील रामेश्वर मंदिरात सर्व विद्यार्थ्यांना दर्शनासाठी नेण्यात आले. युनिफाइड संकल्पनेच्या आधारावर आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या विद्यार्थ्यांसोबत सामान्य शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात आला. त्यासाठी नगरपालिका शाळा क्रमांक ९ यांनी भजन, नृत्य सादर केले. त्यानंतर प्रसादाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
...........
खालापुरातून २५ हजार वारकरी पंढरीकडे रवाना
खालापूर, ता. ६ (बातमीदार) : संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खालापूर तालुक्यातून जवळपास २५ हजार विठूमाउलीचे भाविक आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला रवाना झाले. तालुक्याला अध्यात्माचा वारसा असून, माळकरी वर्ग मोठ्या संख्येने आहे. आषाढी एकादशीनिमित्ताने बस, खासगी वाहन, एसटी अशा विविध वाहतुकीच्या साधनांनी हजारो वारकऱ्यांनी पंढरपूरची वाट पकडली. तालुक्यातील गावागावातून पंढरपूरसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत औषधे, पाणी, बिस्कीट यांची सोय केली आहे.
..................
तळ्यात ढोलकीच्या तालावर विठूरायाचे भजन
तळा, ता. ६ (बातमीदार)ः आषाढी एकादशीनिमित्त तळा शहरातील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजली जावी, या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मराठी शाळा ते नगरपंचायत चौकपर्यंत काढण्यात आलेल्या दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थी पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. या वेळी विठ्ठल- रखुमाईंची पालखी सजविण्यात आली होती. शिस्तबद्ध पद्धतीने ढोलकीच्या तालावर विठुरायाचे भजन व अभंग गात विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गही तल्लीन होऊन नाचत होता. या दिंडीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर, सहशिक्षक सुनील बैकर, मित्तल वावेकर, सुभाष मुंढे बुवा यांसह मराठी शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT