रस्त्यांवरचा भार वाढला
जिल्ह्यात सहा महिन्यांत एक लाख नवीन वाहने
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ ः वाहतूक कोंडीने ठाणे शहरासह जिल्ह्यातील चालक त्रस्त आहेत; त्यात आता मागील सहा महिन्यांत आखणी लाखभर वाहनांचा भार वाढला आहे. ठाणे, कल्याण, वाशी या तीन प्रादेशिक पहिवहन कार्यालयांत जानेवारी ते जून या काळात एक लाख १९ हजार ६०३ नवीन वाहनांची नोंद झाली आहे. वाढत्या वाहनांमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर आणखी ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात प्रदूषण आणि कोंडीच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
ठाणे शहराला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. महामार्ग आणि उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरातील वाहतूक मंदावली आहे. ठाण्याच्या प्रवेशद्वारापासून ते थेट घोडबंदर मार्गापर्यंतचा प्रवास मंदावला आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गाचा प्रवास टाळा आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक वळवा, अशी विनवणी करण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील मुंबई-नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण, भिवंडी-वाडा मार्ग, पलावा-काटई मार्ग, अंबरनाथ, बदलापूर मार्गावर आहे; मात्र तरीही गरजेतून नवीन वाहन घेण्याची हौस कमी झालेली नाही. उलट ती वाढतच असल्याचे दिसत आहे.
परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत म्हणजेच १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत एक लाख १९ हजार ६०३ वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत सर्वाधिक ५२ हजार ८७० वाहनांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये नवीन वाहन नोंदणी ४८ हजार २८० इतकी होती. यापाठोपाठ कल्याणचा क्रमांक लागतो. गेल्यावर्षी जिल्ह्यात एकूण नवीन वाहनांची संख्या एक लाख १० हजार ६९० होती; पण यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांतच वाहन खरेदी आणि नोंदणीचा उच्चांक गाठला गेला आहे.
ठाण्याची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात आहे. तर जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी १० लाखांपर्यंत पोहोचली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यातील वाहनांची संख्या आता २० लाखांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे प्रत्येक पाच माणसांमागे एक वाहन संख्या आहे. त्यात रोज नवीन वाहनांची भर पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांचा ताण वाढत चालला आहे. केवळ वाहतूक कोंडीच नव्हे तर पार्किंगची समस्याही यामुळे भविष्यात उग्र रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या ठाणे शहरात अधिकृत सार्वजनिक वाहनतळांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे मिळेल तिथे वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे.
उपाययोजनांची गरज
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी वाहन खरेदी करताना पार्किंग आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. त्यासाठी लवकरच शासकीय स्तरावर धोरण अमलात येणार आहे; पण केवळ हा उपाय पुरेसा नसल्याचे मत शहर नियोजनतज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले आहे. मुळात आपल्याकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यात लाख रुपयांत वाहने पुरवणाऱ्या कंपन्यांचा धुमाकूळ सुरू आहे. स्वतःकडे गाडी असणे पूर्वी प्रतिष्ठेचे मानले जायचे; पण आता ती गरज ठरत आहे. किंबहुना तशी गरज निर्माण केली जात आहे. त्यामुळे दुचाकीसह चारचाकी वाहनांच्या मागणीत भर पडली आहे; पण या वाहनांना लागणारे इंधन, पार्किंग आणि वाहतुकीसाठी रस्ते भविष्यात तोकडे पडणार आहेत. यासाठी शासकीय स्तरावर उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे मत महाजन यांनी व्यक्त केले आहे.
हौसेसाठी खरेदी
केवळ रस्ते रुंद करून किंवा उड्डाणपुलांची संख्या वाढवून ही समस्या निकाली निघणार नाही. अनेक पाश्चात्त्य देशांनी वाहतुकीसाठी बांधलेले उड्डाणपूल पाडले आहेत. वाहनांना रस्ता मोकळा करून देणे हा उपाय नसून उलट त्यामुळे नवीन वाहनांना वाट मोकळी होत आहे. आज अनेक देशांमध्ये केवळ गरजेपोटी वाहने वापरली जात आहेत. काही देशांमध्ये तेथील नागरिकांनी सायकलवरून प्रवास सुरू केला आहे. आपल्याकडे कोणाकडे किती वाहने असावीत, याचा ताळमेळ नाही. काहीजण गरजेसाठी तर काही हौस म्हणून वाहने वाढवत आहेत. ही चिंतेची बाब असून सरकारी यंत्रणा आणि सत्ताधारी विचार करण्यास तयार नसल्याची खंतही शहर नियोजनतज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केली आहे.
नवीन वाहने (१ जानेवारी ते ३० जून)
ठाणे- ५२,८७०
कल्याण- ४५,४५३
वाशी- २१,२८०
(जानेवारी ते ३० जून २०२४)
ठाणे- ४८,२८०
कल्याण- ४२,०९८
वाशी- २०,२५३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.