कर्जत, ता. ६ (बातमीदार) ः पाली भुतिवली धरणासाठी विस्थापित करण्यात आलेल्या कुटुंबांचे प्रशासनाने ज्या भागात पुनर्वसन केले आहे, ती जागा दरडप्रवण आहे. २०२१ मधील महापुरानंतर परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे या भागाची धोकादायक स्थिती अधोरेखित झाली होती, तरीही प्रशासनाने धरणग्रस्तांना याच ठिकाणी घरे बांधून स्थलांतरित केल्याने पावसाळ्यात त्यांचा जीव टांगणीला असतो. दरडग्रस्त वरेडी गावाची नाशिक येथील भूवैज्ञानिक रणधीर चव्हाण यांनी नुकतीच पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत लघुपाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता आकाश गवारे, तसेच पाली भुतिवली धरण बचाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सचिन गायकर व सचिव सचिन गायकवाड उपस्थित होते.
संघर्ष समितीने ५ मार्च २०२५ पासून २९ जून २०२५पर्यंत १८ वेळा लेखी निवेदने प्रशासनाला दिली आहेत. जलसंपदा विभाग, कोकण भवन, कर्जतचे उपविभागीय अधिकारी व पाटबंधारे विभाग यांना पूरस्थितीची आणि भूस्खलन धोक्याची माहिती वेळोवेळी दिली आहे; मात्र आजतागायत कोणतीही उपाययोजना किंवा सुरक्षाव्यवस्था करण्यात आली नसल्याचे संघर्ष समितीकडून सांगण्यात आले.
पाली भुतिवली धरणग्रस्तांना दिलेल्या जागेला २०२१ पासून दरडप्रवण म्हणून घोषित करण्यात आले आहे. सरकारीस्तरावर आजपर्यंत फक्त पाहणी झाली आहे. दरडग्रस्तांच्या जीवाशी खेळ न करता त्यांचे सुरक्षितस्थळी कायमस्वरूपी स्थलांतर करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
- सचिन गायकवाड, सचिव, पाली भुतिवली धरण बचाव शेतकरी संघर्ष समिती