वाणगाव, ता. ६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात सध्या भातशेती लावणीची कामे सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने साथ दिल्यामुळे बळीराजा भातशेती एकदा लावणीची कामे कशी पूर्ण होईल, यासाठी प्रयत्नशील आहे. डहाणू तालुक्यात मागील दोन दिवसांत जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. भात खाचरात प्रमाणापेक्षा पाणीसाठा झाल्याने वाणगाव, आईना, दाभोळ, रणकोळ, उर्से या भागात भातलावणीचा वेग मंदावला आहे. मुसळधार पावसाने भात खाचरे तुडुंब भरली आहेत, त्यामुळे नव्याने लावणी करण्यात आलेली भात शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भात लावणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.
डहाणू तालुक्यात काही भागांमध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून भात लावणीची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. नुकतीच नव्याने लावणी करण्यात आलेली भात रोपे जमिनीत अजून स्थिरावलेली नाहीत, त्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भात खाचरात प्रमाणापेक्षा जास्त पाणी साचल्याने भात रोपे कुजण्याचीही शक्यता आहे.
सध्याच्या परिस्थितीत पावसाने जोर धरल्याने तालुक्यातील भात शेती लावणीचा वेग काही प्रमाणात मंदावला जरी असला तरीही पुढील काही दिवसातच पावसाने उसंत घेतल्यास भात शेतीलावणीची कामे पूर्ण होतील, असा अंदाज आहे.
भातखाचरात प्रमाणापेक्षा जास्त पाणी साचले आहे. त्यामुळे भातलावणी करणे अडचणीचे झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच भातलावणीची कामे हाती घेतले आहेत, परंतु पावसाने जोर धरल्यामुळे भातलावणी विलंब होत आहे, परंतु पुढील दिवसात पावसाचा जोर कमी झाला तर भात लावणीच्या कामांना गती प्राप्त होईल, असे भात शेतकरी सांगत आहेत.
----
नालासोपाऱ्यात मुख्य रस्ते जलमय
नालासोपारा (बातमीदार) : वसई, विरार, नालासोपारामध्ये दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील नागीनदास पाडा, आचोळा रोड, गाला नगर, परिसरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावरील फेरीवाले, वाहनधारक यांचे मात्र या साचलेल्या पाण्यामुळे हाल सुरू आहेत. नागीनदास पाडा हा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेल्याने १०० मीटरवर असणाऱ्या महापालिकेच्या रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांचेही हाल झाले आहेत. आज (ता. ६) दिवसभर रिमझिम पावसासह अधूनमधूनच मुसळधार पाऊस पडत असल्याने दुपारनंतर सकल भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसाची संततधार अजूनही सुरूच असून, हवामान खात्याने पुढील काही तासांत आणखी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीने पाणी निचरा करण्याच्या उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून परिस्थिती सामान्य होऊ शकेल.
---
मोखाड्यात दोन दिवसांपासून संततधार
मोखाडा (बातमीदार) : तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. प्रवाहित झालेले धबधबे जोरात कोसळत आहेत. शेतीची कामे ठप्प झाली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारे २८५ मीटर पाणी क्षमतेचे मोखाड्यातील मध्यवैतरणा धरण २७७ मीटरपर्यंत भरले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.