ठाणे शहर, ता. ९ (बातमीदार)ः कर्तव्यावर असताना एखाद्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत शिळे अन्न कसे ओळखायचे, ते तपासणीसाठी घेताना कशी, कोणती काळजी घ्यावी, याबाबतचे धडे डॉक्टरांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांना दिले. या प्रशिक्षणासाठी २५ अधिकारी सहभागी झाले होते. या प्रशिक्षण सत्रात अन्न भेसळीमुळे होणाऱ्या गंभीर आजारांचीही माहिती देण्यात आली.
बाजारातील भेसळयुक्त, निकृष्ट शिळे, विषारी अन्न आणि त्यांच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाईची जबाबदारी आहे. त्यासाठी अन्न ओळखणे, त्याचा पुरावा म्हणून वापर करण्याकरिता घटकांच्या माहितीचे टिपण करणे, या कामांमध्ये अधिकाऱ्यांना मदत मिळावी म्हणून आहारतज्ज्ञ आणि वैद्यकीय डॉक्टरांनी मंगळवार (ता. ८) अन्न व औषध विभागातील अधिकाऱ्यांना कार्यपद्धती, जबाबदाऱ्या, अन्न सुरक्षेचे धोरण, धूम्रपान प्रतिबंध, तसेच विषबाधा यांसारख्या आरोग्यविषयक संकटांमध्ये आवश्यक उपाययोजनांबाबत सखोल मार्गदर्शन केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले.
---------------------------------------------------
यांचे मोलाचे मार्गदर्शन
आहारतज्ज्ञ गायत्री पाटील यांनी विविध आजारांबरोबर आहारातील संतुलित पोषण, योग्य कॅलरीवर मार्गदर्शन केले. सिव्हिल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वास वासनिक यांनी विषबाधा झाल्यानंतर तातडीच्या उपचार पद्धती, लक्षणे ओळखण्याची पद्धत आणि औषधोपचारांची दिशा यावर प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती दिली. विषबाधेच्या वेळी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घ्यावयाची तत्काळ भूमिका स्पष्ट करण्यात आली. या कार्यक्रमात ग्राहक संरक्षण विभागाचे गजानन पाटील, अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त अरविंद खडके यांनीदेखील मार्गदर्शन केले.
---------------------------------------------
अन्न सुरक्षा यंत्रणेची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. नवनियुक्त अधिकाऱ्यांसाठी हा अनुभव मार्गदर्शक, प्रेरणादायी ठरला.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
---------------------------------------------
महाप्रसाद किंवा लग्नासारख्या ठिकाणी, रुग्णालयांमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या तपासणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण त्यांच्या कामाकरिता महत्त्वाचे ठरणार आहे.
- गजानन पाटील, प्रकल्प अधिकारी, ग्राहक संरक्षण विभाग