रोहा, ता. १२ (बातमीदार) ः तालुक्यातील तांबडी येथील एका अल्पवयीन मुलीवर २०२० मध्ये अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले. असे असताना या प्रकरणातील आरोपींची माणगाव सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली. ख्यातनाम वकील उज्ज्वल निकम यांनाही हा निकाल अनपेक्षित असल्याचे सांगत मीमांसा केली आहे. सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख यांच्यासह पीडितेच्या कुटुंबीयांनी खटल्यातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची मुंबईत भेट घेतली व उच्च न्यायालयातील पुढील प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली.
सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात महिनाभरापूर्वी तालुक्यातील बहुजन समाजाने आक्रोश व्यक्त केला होता. आरोपींच्या सुटकेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर काढलेल्या आलेल्या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांनीही हा निकाल वेदनादायी असल्याची भावना व्यक्त केली. तटकरे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन उच्च न्यायालयात अधिक सक्षमतेने खटला चालविण्याची ग्वाही दिली. याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख यांच्यासह पीडितेच्या कुटुंबीयांनी खटल्याचे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची मुंबईत भेट घेतली व उच्च न्यायालयातील पुढील प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात काही दिवसांतच खटला दाखल होणार आहे. त्यासाठी सक्षम सरकारी वकील द्यावा लागेल, अशी माहिती आप्पा देशमुख यांनी दूरध्वनीवरून आदिती तटकरेंना दिली. त्यावर सरकारी वकिलाबाबत लवकरच चर्चात्मक निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली. तर निर्भयाच्या न्यायासाठी समाज पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचेही त्यांनी सांगितले.
रोहा : सकल मराठा समाजाचे अध्यक्षांसह पीडितेच्या कुटुंबीयांनी ॲड. उज्ज्वल निकम यांची भेट घेतली.