मुंबई

कल्याण अवती-भवती

CD

पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांचे युवासेनेकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : निळजे येथे मानपाडा पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे तब्बल दोन कोटी १२ लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. या प्रकरणात आफ्रिकन नागरिकाला अटक करून आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट उघडकीस आणले गेले. आठवडाभरात मानपाडा पोलिसांनी सलग दोन मोठ्या कारवाया करीत एकूण चार कोटींहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्स जप्त केले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कामगिरीमुळे युवासेना कल्याणच्या वतीने कल्याण परिमंडळ-३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. युवापिढीला नशेच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलिस प्रशासनाने घेतलेली ही तत्परता, सजगता आणि धाडस अभिमानास्पद आहे. या कार्यात युवासेना नेहमीच पुढाकार घेऊन जनजागृती करेल, असे आश्वासन युवासेना कल्याण जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील यांनी दिले. या वेळी युवसेनेचे कल्याण जिल्हा सचिव राहुल म्हात्रे, उपजिल्हा अध्यक्ष प्रथमेश पाटील, भूषण यशवंतराव, डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, कल्याण शहर अध्यक्ष सुजित रोकडे, सागर दुबे, जय देसले, विक्की जोशी, चिन्मय जयंता पाटील, सुचेत डामरे उपस्थित होते.
.......................
गुरुपौर्णिमेनिमित्त एसएसटी महाविद्यालयाचा गौरव सोहळा
कल्याण (वार्ताहर) : एसएसटी महाविद्यालयाने गुरुपौर्णिमेची परंपरा जपत टाऊन हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला, तर उपस्थित पालक भावुक झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, ठाण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बनसोडे, महाविद्यालयाचे चेअरमन आणि संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी, आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी आणि इंदर मूलपानी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य आणि गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुरूंच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. मनोज रेड्डी यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा तसेच व्यायाम आणि आरोग्य राखण्याचा सल्ला दिला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करीत एसएसटी महाविद्यालयाचे विशेष आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. त्यांनी गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करीत उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात संजीवनी सांस्कृतिक समितीचे प्रमुख डॉ. तुषार वाकसे यांचे विशेष योगदान राहिले. त्यांनी सर्व प्राध्यापक व स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडला.
................
बँकेच्या शाखेत भारतमातेच्या प्रतिमेची स्थापना
कल्याण (वार्ताहर) : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्राचे राष्ट्रीय विकासातील योगदान अधोरेखित करण्यासाठी दी कल्याण जनता सहकारी बँकेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांचा उद्देश सहकार मूल्यांची पुनर्स्थापना करणे, सामाजिक ऐक्य, राष्ट्रप्रेम आणि नागरिक जबाबदारी याबाबत जनजागृती करणे हा आहे. त्या उपक्रमाअंतर्गत बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये भारतमातेची प्रतिमा कायमस्वरूपी प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने गुरुपौर्णिमेनिमित्त बँकेच्या कल्याण, उल्हासनगर आणि पुण्यातील सर्व शाखांमध्ये भारतमातेच्या प्रतिमेची स्थापना बॅंकेचे संचालक, सभासद, ग्राहकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आली. दी कल्याण जनता सहकारी बँक ही एक जबाबदार सहकारी संस्था म्हणून नेहमीच सामाजिक व राष्ट्रीय विषयांवर पुढाकार घेत असते. या उपक्रमातून बँकेने सहकार क्षेत्रात एक सकारात्मक व प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
...................
सम्राट अशोक विद्यालयात वर्ग प्रतिनिधी निवडणूक
कल्याण (वार्ताहर) : विधानसभा, विधान परिषद निवडणुकीप्रमाणे सम्राट अशोक विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची वर्ग प्रतिनिधी निवडणूक लोकशाही पद्धतीने पार पडली. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये मतदान जागृती व्हावी तसेच लोकशाही पद्धतीने निवडणुका कशा घेतल्या जातात याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी ही मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे, प्रचार करणे, मतपत्रिकेद्वारे मतदान करणे, मतमोजणी आणि निकाल जाहीर करणे असा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. मतदान अधिकाऱ्यांपासून ते निकाल जाहीर होईपर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांनी केली. धनश्री मुसळे-पाचवी, केतन राठोड व मनस्वी निकम-सहावी, श्रीया विरनक-सातवी, आयुष तपासे व धनश्री कासार-आठवी, रिद्धी कदम-नववी, पीयूष मेचकर व विक्रम भोरे-दहावी या विद्यार्थ्यांनी मताधिक्य घेत वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडणूक जिंकली. आपापल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना उचलून घेत जल्लोष केला. नीलेश वाघमारे या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याचा एक मताने पराभव झाला. त्यामुळे एक मत किती महत्त्वाचे असते, हेही विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहशिक्षक ओमप्रकाश धनविजय यांचे सहकार्य लाभले.
...................
सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण
कल्याण (वार्ताहर) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मुंबई, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने ६४व्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल सब ज्युनिअर, ज्युनिअर मुले व मुलींच्या स्पर्धेचे आयोजन शहाड पश्चिम येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या मैदानावर केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महापालिकेच्या क्रीडा विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत ६० संघ सहभागी झाले होते. १५ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत अंतिम सामना लोढा वर्ल्ड स्कूल, पलावा आणि बी. के. बिर्ला स्कूल यांच्यात झाला. या स्पर्धेत लोढा वर्ल्ड स्कूल, पलावा या शाळेचा संघ विजयी झाला, तर उपविजयी बी. के. बिर्ला स्कूल, कल्याण आणि तिसरा क्रमांक ब्रायटन वर्ल्ड स्कूल यांनी पटकावला. तसेच १७ वयोगटातील मुलांचा अंतिम सामना बी. के. बिर्ला स्कूल व स्वामी विवेकानंद स्कूल यांच्यात झाला. या सामन्यात बी. के. बिर्ला स्कूलचा संघ अंतिम विजयी ठरला. द्वितीय क्रमांक स्वामी विवेकानंद स्कूल यांनी तर तृतीय क्रमांक ओंकार इंटरनॅशनल स्कूल यांनी पटकावला. १७ वर्षीय मुलींच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना लोढा वर्ल्ड स्कूल, पलावा व सेंट लॉरेन्स स्कूल यांच्यामध्ये झाला. यामध्ये अंतिम विजयी संघ लोढा पलावा स्कूल ठरले, तर द्वितीय क्रमांक सेंट लॉरेन्स आणि तृतीय क्रमांक बी. के. बिर्ला स्कूल यांनी पटकावला आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (ता. १०) क्रीडा विभागाचे उपायुक्त संजय जाधव, क्रीडा पर्यवेक्षक प्रवीण कांबळे, खेळ प्रमुख डॉ. विजयसिंह, बी. के. बिर्ला कॉलेजचे स्पोर्टस डायरेक्टर यज्ञेश्वर बागराव, कृष्णा माळी तसेच फुटबॉलपटू सॅमसंग यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ झाला.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman : हिंदू संस्कृतीने भारावून गेलेली रशियन महिला मुलांसह आढळली गोकर्णच्या जंगलात; गुहेत तिच्यासोबत काय घडलं?

Latest Marathi News Updates : शरद पवारांच्या पक्षात भाकरी फिरणार? प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदेंचे नाव चर्चेत

साप्ताहिक राशिभविष्य : (१३ जुलै २०२५ ते १९ जुलै २०२५)

आशियाई अन्‌ विश्‍वकरंडकाच्या तयारीला वेग

पांढरी होणारी दाढी अन् निवृत्ती (एक काल्पनिक कथा)

SCROLL FOR NEXT