मुंबई

मुजोर रिक्षाचालक वठणीवर

CD

मुजोर रिक्षाचालक वठणीवर
१० हजार रुपये दंडाच्या धसक्याने बेकायदा वाहतुकीला आळा
ठाणे शहर, ता. १३ (बातमीदार) : प्रवाशांना चालकाच्या सीटवर बसवून धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर १० हजार रुपये दंड आकाराताच मुजोर चालक वठणीवर आल्याचे दिसते आहे. दंडाचा धसका घेतलेले रिक्षाचालक शिस्तीत तीन प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. शेअरिंग रिक्षाचालकांकडून होणारी धोकादायक वाहतूक आणि प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी काही दिवसांपासून ठाणे वाहतूक विभागाने चौथ्या सीटवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील रिक्षाचालकांकडून प्रवाशांवर केली जाणारी मुजोरी आणि धोकादायक वाहतुकीविरोधात ठाणे वाहतूक विभागाला अनेक दक्ष नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली होती. या कारवाईत पथकांची निर्मिती करून ठाणे वाहतूक विभागाने ठीकठिकाणी नाक्यांवर विशेष बंदोबस्त लावला. त्याचप्रमाणे शेअरिंग रिक्षा स्टॅन्डच्या ठिकाणीदेखील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. प्रवाशांची धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या शेअरिंग रिक्षाचालकांना टार्गेट करीत त्यांच्यावर कारवाया सुरू केल्या. त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. ठाणे विभागात सर्रासपणे दिसणाऱ्या चौथ्या सीटच्या रिक्षा आता गायब झाल्या असून, ते आता नियमाचे पालन करीत आहेत.

१ फेब्रुवारीपासून रिक्षाचालकांना तीन रुपयांची भाडेवाढ मंजूर झाली. मीटर भाडेवाढीसोबतच प्रादेशिक परिवहन विभागाकडून शेअरिंग रिक्षाचालकांनासुद्धा ३३ टक्क्यांची भाडेवाढ घेण्याची मुभा दिली. दरम्यान, ३३ टक्क्यांची भाडेवाढ मिळूनही शेअरिंग रिक्षाचालक जादा भाडे आणि जादा प्रवाशांची वाहतूक करून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करीत आहेत. अनेक मार्गांवर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात अशी वाहतूक होते. रिक्षाचालक जादा भाडे मिळवण्याच्या हेतूने फ्रंट सीटला दोन आणि पाठीमागे चार अशाप्रकारे एका खेपेला सहा प्रवाशांचीही वाहतूक करीत होते.

अनेकदा वाहतूक विभागाकडून अशा रिक्षाचालकांवर ऑनलाइन दंडात्मक कारवाई सुरू होते. परंतु फ्रंट सीटप्रकरणी रिक्षाचालक आढळून आला तर त्याला १,५०० रुपये दंड केला जायचा; मात्र एवढ्या दंडाची रक्कम किरकोळ वाटू लागल्याने अशा कारवाईचा त्यांच्यावर परिणाम होत नव्हता. त्यामुळे आता फ्रंट सीटवर प्रवाशाला बसवणाऱ्या रिक्षाचालकाला १० हजार रुपयांचा दंड केला जाऊ लागला आहे. रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी उप आयुक्तांची भेट घेऊन १० हजार रुपयांचा दंड कमी करून तो पूर्वीप्रमाणेच १,५०० रुपये करावा, अशी मागणी केली आहे. तसेच परिवहन मंत्र्यांनादेखील निवेदन देण्यात आले आहे.

शेअरिंगसाठी भाडेवाढ
रिक्षाचालकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेत त्यांनी मागणी केल्याप्रमाणे शेअरिंग प्रवासासाठी भाडेवाढ मंजूर करून दिली आहे. परंतु ही भाडेवाढ तीन प्रवाशांनाच विचारात घेऊन केलेली असल्याने त्यांना चौथ्या प्रवाशाची वाहतूक करता येणार नाही. असे केल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी सांगितले.

काही वेळा प्रवासी इच्छितस्थळी जाण्यासाठी पुढच्या सीटवर बसतो; मात्र असे करणे धोकादायक आहे. आपल्या जीवापेक्षा दुसरे कशाचेही मोल अधिक नाही, हे प्रवाशांनी लक्षात ठेवून रिक्षाचालकाकडे तीन प्रवाशांची वाहतूक करण्याचा आग्रह धरला पाहिजे. नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात ऑनलाइन किंवा व्हॉट्सॲपवर तक्रार करता येते.
- पंकज शिरसाट, उपायुक्त वाहतूक विभाग, ठाणे

केलेली कारवाई : २१,१६४
आकारलेला दंड : ३,७८,३४,३५०


फोटो : रिक्षा स्टॅण्डवर प्रवासी घेताना रिक्षाचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : सकाळी ६ वाजता पुन्हा सुरू झाला डी जे चा दणदणाट, पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष अखंड

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT