ओलसर कपड्यांमुळे फंगल इन्फेक्शन
गायत्री ठाकूर ः सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : पावसाळा सुरू होताच वातावरणात गारवा, दमटपणा आणि सततची ओलसरता निर्माण होते. यामुळे शरीरावर त्वचेचे विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता बळावते. त्यात सर्वाधिक आढळणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन होय. ओलसर कपडे, बुरशीयुक्त वातावरण, शरीर नीट कोरडे न करणे यामुळे फंगल संसर्गाचा धोका वाढतो. अनेक वेळा लोक ऑफिसमध्ये, प्रवासात किंवा महाविद्यालयात असताना ओले कपडे घालूनच राहतात. त्यामुळे पायातील बूट किंवा सॉक्स ओले राहतात, कधी-कधी अंतर्वस्त्रे ओलीच राहतात. अशा वेळी खाज, खरूज, त्वचा काळवंडणे, फोड येणे अशा समस्या सुरू होतात. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना अशा संसर्गाचा धोका अधिक असतो.
डॉक्टरांच्या मते फंगल इन्फेक्शन झाल्यास कोणतीही घरगुती औषधे न वापरता त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. बाजारात मिळणाऱ्या क्रीम्स, पावडरमुळे तात्पुरता आराम मिळू शकतो, पण मूळ बुरशी कायम राहिल्यास संसर्ग पुन्हा होतो. योग्य औषधोपचार, स्वच्छता आणि कोरडे वातावरण हेच यावर उत्तम उपाय आहेत. शरीर कोरडे पुसण्यासाठी मऊ टॉवेलचा वापर करा.
फंगल इन्फेक्शन म्हणजे?
त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग होणे, पायांची बोटे, काखा, मांडी, शरीराची घाम येणारी ठिकाणे या भागांमध्ये विशेषतः फंगल इन्फेक्शन अधिक प्रमाणात दिसून येते. यामध्ये त्वचेवर खाज येणे, लालसर चट्टे तयार होणे, चिडचिड होणे, आग होणे ही लक्षणे दिसून येतात. वेळेत उपचार न घेतल्यास हा संसर्ग अधिक पसरू शकतो.
निरोगी त्वचेसाठी काय करावे?
१. निरोगी त्वचेसाठी पावसाळ्यात त्वचा कोरडी ठेवा.
फंगल इन्फेक्शन झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित उपचार घेणे.
२. नियमित अंघोळ करा आणि त्वचेच्या ओलसर भागात अँटीफंगल पावडर वापरा.
३. सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः जिम किंवा स्विमिंग पूलमध्ये स्वच्छता राखा.
काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात त्वचा ओलसर राहात असल्याने ओलसर जागी फंगल इन्फेक्शन होते. ते टाळण्यासाठी त्वचा कोरडी ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय ओलसर कपडे घालू नयेत. पाण्यात जाणे टाळावे, कोरड्या व सैल कपड्यांचा वापर करावा. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होत नाही.
पावसाळ्यात त्वचेला कोरडे ठेवणे फार गरजेचे आहे. विशेषतः कपडे बदलताना अंग पूर्ण कोरडे पुसणे गरजेचे आहे. ओले सॉक्स किंवा गट्ट कपडे टाळा, जिथे घाम येतो अशा भागात अँटीफंगल पावडर लावायला हवी. संसर्ग दिसल्यास लगेच डॉक्टरांकडे जा, तसेच घरगुती उपाय किंवा कोणत्याही न सांगितलेल्या क्रीम्सचा वापर टाळायला हवा.
डॉ. वैशाली देशमुख, त्वचारोगतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.