कल्याणनाका रस्त्याचे रुंदीकरण
मागील आठवड्यापासून सीमांकनाचे काम
भिवंडी, ता. १६ (बातमीदार) : महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यानुसार मेट्रो रेल्वेसाठी पालिकेच्या क्षेत्रातील बायपास राजीव गांधी चौक, कल्याणनाका आणि कल्याणनाका ते अंजूरफाटा या मार्गाचे रस्ता रुंदीकरण होणार आहे. मागील आठवड्यापासून याबाबत सीमांकन करण्याचे काम सुरू झाले आहे.
भिवंडी महापालिकेच्या नगररचना विभागाने मागील वर्षी महापालिका क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या हेतूने नव्याने प्रारूप आराखडा तयार केला आहे. त्यानुसार शहरात येणाऱ्या मेट्रोनिमित्त अंजूरफाटा ते कल्याणनाका आणि कल्याणनाका ते भिवंडी साईबाबा बायपासच्या महानगरपालिका हद्दीपर्यंत रस्ता रुंदीकरणाची तरतूद केली आहे. ठाणे- कल्याण- भिवंडी मेट्रो पाच या मेट्रो मार्गाचे काम शहरातील धामणकर नाक्यापर्यंत पूर्ण होत आले आहे; मात्र कल्याणनाक्यापासून पुढे नागरिकांचे आक्षेप आल्याने हे काम थांबले होते. त्यामुळे हा प्रकल्प रेंगाळला होता; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी कल्याणनाका येथे जमिनीखालून मेट्रो नेण्यासाठी हिरवा झेंडा दाखवून त्यासाठी निधीची तरतूद केली.
रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक असल्याने महापालिकेने प्रारूप आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरणासाठी सीमांकन करण्याचे काम मागील आठवड्यापासून सुरू केले आहे. यासाठी महापालिकेचे उपायुक्त (मुख्यालय) विक्रम दराडे यांनी कार्यालयीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार या कामासाठी पालिकेच्या एकूण पाच प्रभागांच्या सहाय्यक आयुक्तांवर सीमांकन झाल्यानंतर निष्कासन करण्याची जबाबदारी सोपविली आहे. तसेच, त्यांच्या मदतीसाठी पाच प्रभागांतील बिट निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
१५ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आदेश
प्रभागातील पाच भूभाग लिपिकांना बाधित मालमत्तेची माहिती संकलित करण्याचे काम सोपविले आहे. तर पाच बांधकाम विभागातील उपअभियंता यांनी घटनास्थळी उपस्थित राहून लागणारी साधनसामग्री देण्यासाठी नियुक्ती केली आहे. तसेच शहर विकास अधिकारी यांनी झालेल्या कामाचा अहवाल वरिष्ठांकडे देण्याची जबाबदारी सोपविली आहे. राज्य सरकारने मेट्रोच्या कामाला गती दिल्याने महापालिकेची संपूर्ण यंत्रणा मेट्रोच्या कामाला जुंपली आहे. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे आदेश पालिकेचे उपायुक्त दराडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
पर्यायी जागेसाठी धावपळ
सीमांकनाच्या कामामुळे कल्याण रोड व अंजूर फाटा मार्गावरील व्यापाऱ्यांची पर्यायी जागेसाठी त्यांची धावपळ सुरू झाली आहे. भिवंडीतील नागरिकांसाठी मेट्रोची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी भिवंडीतील सत्ताधारी आणि विरोधकदेखील प्रयत्नशील आहेत. त्यामुळे लवकरच मेट्रो पाचचे काम पूर्ण होईल, असे वेध भिवंडीवासीयांना लागले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.