मुंबई

थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

CD

वाशीमध्ये दोन लाख रुपये किमतीचे दागिने लुटले
नवी मुंबई (वार्ताहर) : चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघा लुटारूंनी मोटारसायकलवरून जाणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातील तब्बल सव्वादोन लाख रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून पलायन केल्याची घटना गत सोमवारी रात्री वाशीमध्ये घडली. वाशी पोलिसांनी या लुटारूंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. वाशी सेक्टर-१५मध्ये राहणारा नीलेश पाटील (वय ३५) हा १४ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोपरखैरणेकडून वाशी रेल्वे स्टेशनच्या दिशेने आपल्या मोटारसायकलवरून जात होता. या वेळी तो मुंबई बँकेच्या स्टॉपवर आला असताना नंबर नसलेल्या मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंपैकी पाठीमागे बसलेल्या चोराने नीलेश पाटील याच्या मानेवर जोरात हात मारून त्याच्या गळ्यातील २३ ग्रॅम वजनाची सव्वादोन लाख रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून वाशी गाव अंडरपासच्या दिशेने पलायन केले. या वेळी नीलेश पाटील याने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र लुटारू मुंबईच्या दिशेने वेगाने पळून गेले. त्यानंतर त्याने वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
..................
बांठिया विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्‍कार
नवी मुंबई ः के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालयात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा नुकताच साजरा करण्यात आला. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य माळी, उपप्राचार्य आंबरे, ज्येष्ठ पर्यवेक्षक महाजन, पर्यवेक्षक गोखले, पर्यवेक्षिका वेलणकर यांच्या हस्ते शिष्यवृत्तीस पात्र ठरलेली विद्यार्थिनी काव्या संदीप जोशी हिचे पुष्पगुच्छ आणि पेन देऊन कौतुक करण्यात आले. या वेळी उपस्थित पालक स्वाती जोशी यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पूर्व माध्यमिक आणि पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती शिकविणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी सांस्कृतिक विभागप्रमुख आशालता पाटील, शिक्षिका गुंड, तेजश्री पाटील, आंबरे, कदम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
................
मृत व्‍यक्‍तीची ओळख पटविण्याचे आवाहन
नवी मुंबई (वार्ताहर) : नेरूळ पूर्वेकडील हिरकणी इमारतीसमोर पार्किंगकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला गत ३ जुलै रोजी मृतावस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. त्‍यामुळे नेरूळ पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच त्याच्या नातेवाइकांचादेखील शोध सुरू केला आहे. गत ३ जुलै रोजी नेरूळ येथील हिरकणी इमारतीसमोर पार्किंगकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला फुटपाथवर अंदाजे ६० वर्षे वयोगटातील एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी त्याला महापालिका रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या व्यक्तीजवळ त्याची ओळख पटविण्यासारखी कुठलीही वस्तू आढळून न आल्याने पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली. यातील मृत व्यक्ती अंदाजे ६० वर्षे वयोगटातील आहे. त्‍याची उंची पाच फूट ११ इंच असून तो अंगाने सडपातळ व गहू वर्णाचा आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी नेरूळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
..................
नागरी समस्यांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
जुईनगर (बातमीदार) : नेरूळ विभागातील दारावे परिसरात विविध नागरी समस्यांविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाला आहे. दारावे परिसरात अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असताना, महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने विभाग अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली आहे. परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा, गटारातील पाणी तलावात जाणे, अंतर्गत रस्ते आणि गटारांची दुरवस्था, समाजमंदिर, भाजी मार्केट, मच्छी मार्केट उभारणी, स्मशानभूमी नामकरण व वायू प्रदूषण चिमणी बसवणे, परिसरात सीसीटीव्ही, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, पालिका परिवहन बस क्रमांक २१च्या फेऱ्या वाढवणे अशा विविध समस्या आणि प्रलंबित प्रकल्प उभारणीसाठी राष्ट्रवादीच्या गुरुनाथ नाईक यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. याबाबत बेलापूर विभाग अधिकारी अशोक पालवे यांना स्मरणपत्र देताना लवकरच संबंधित प्रश्न मार्गी लावू, असे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना आश्वासित करण्यात आले. दरम्यान, समस्या मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. विभाग अधिकाऱ्यांनी प्रत्येक संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देश दिल्याचे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ नाईक यांनी सांगितले.
..............
दत्ता मेघे संस्थेकडून वाशीमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : ऐरोलीतील दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमी आणि राधिकाबाई मेघे विद्यालयातील इयत्ता दहावी आणि बारावीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बुधवारी वाशीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. या गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ऐरोलीतील राधिकाबाई मेमोरियल शिक्षण संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी बुधवारी वाशीतील सिडको प्रदर्शन सभागृहामध्ये भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी संकल्पना मांडण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेच्या विश्वस्त पुष्पाताई मेघे आणि शमा मेघे, संजय सुरी, ममित चोगुले आणि ऋषी शेरकर हे मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. या सोहळ्यामध्ये प्राचार्य डॉ. राजीव कुमार, मुख्याध्यापिका अलका जाधव आणि संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संतोष राजपूत यांनी ऐरोलीतील दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमी आणि राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या यशस्वी कामगिरीचा आढावा घेतला. तसेच शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

SCROLL FOR NEXT