खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणी ठिय्या आंदोलन
जिल्हाधिकाऱ्यांना अहवालाची प्रत दिल्याने आंदोलन तूर्तास मागे
पेण, ता. १७ (वार्ताहर) : तालुक्यातील वरवणे आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या खुशबू ठाकरे या आदिवासी विद्यार्थिनीचा कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेला सहा महिने उलटूनही संबंधित दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यामुळे सामाजिक संस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. १६) पेण तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते; मात्र याप्रकरणी तहसीलदारांनी चौकशीचे आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे.
या वेळी खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणात आरोग्य विभाग जाणीवपूर्वक प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मयत खुशबूचे वडील नामदेव ठाकरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. यातील चौकशी समितीचा अहवाल २७ फेब्रुवारी २०२५ला परस्पर राज्य शासनाला दिला जातो; मग हाच अहवाल पोलिसांना का दिला जात नाही?, मयत खुशबूचा केमिकल ॲनालिसिस अहवाल पोलिसांना देऊन सार्वजनिक करण्यात यावा, पोलिसांनी खुशबूच्या पालकांच्या व सामाजिक संघटनांच्या तक्रारी निवेदनाच्या आधारावर दोषींवर गुन्हे दाखल करावे, मृत्यू प्रकरण चौकशी समितीने आरोग्य अधिकारी डॉ. विखे यांचा कोणताही जबाब चौकशीत ग्राह्य धरू नये, या प्रकरणात चालढकल करणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पदावरून तत्काळ कार्यमुक्त करावे व त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, खूशबू ठाकरे हिच्या पालकांना १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, आदी मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांना तहसीलदार तानाजी शेजाळ व पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी तत्काळ भेट देऊन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल, केमिकल ॲनालिसिस रिपोर्ट उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रामुळे हे आंदोलन १५ ऑगस्टपर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे; मात्र १५ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला आहे. या वेळी खुशबूचे वडील नामदेव ठाकरे, आई शेवंती ठाकरे, आजोबा राघ्या ठाकरे, राजेश रसाळ, महेश पाटील, ग्राम संवर्धन समिती सदस्य नरेश कडू, मीनल तांडे आदींसह सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.