ध्वजारोहण सोहळ्याचे शेतकऱ्याला निमंत्रण
कोसले गावातील पाडवींना दिल्लीत उपस्थित राहण्याचा मान
टिटवाळा, ता. २० (वार्ताहर) : गावोगावी, खडोपाड्यात बर्फाचे गोळे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा एक सर्वसामान्य माणूस शेतात आमूलाग्र बदल करण्यासाठी झटतो. जिद्द, चिकाटी, अपार कष्ट करण्याची तयारी, प्रबळ महत्त्वाकांक्षा आणि प्रचंड आत्मविश्वास यांच्या जोरावर आधुनिक शेतीवर भर देतो. तितक्याच तत्परतेने राज्य सरकार व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून या शेतकऱ्याला विविध योजना, साह्य, मार्गदर्शन, मदत मिळते. यांच्याच जोरावर हा बर्फाचे गोळे विकणारा सर्वसामान्य माणूस तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील अनेक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळवतो, इतकेच नव्हे तर राजधानी दिल्लीत होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहण्याचा मान मिळतो, ही ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. ही यशोगाथा कल्याण तालुक्यातील कोसले गावातील श्रीराम विठ्ठल पाडवी या शेतकऱ्याची आहे.
कल्याण तालुक्यातील कोसले या छोट्याशा ग्रामीण भागात विठ्ठल पाडवी हे आठ एकर शेतीमध्ये (साडेतीन एकर माळरान) पावसाळ्यात थोड्या शेतात भातलागवड करत; मात्र त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांचा मुलगा श्रीराम यांनी शेतीकडे पाठ फिरवली. त्यांनी उन्हाळ्यात बर्फाचे गोळे (कुल्फी) विक्री चालू केली. रोजची चांगली कमाई होत असे; मात्र वडिलांच्या मृत्यूमुळे संपूर्ण जबाबदारी श्रीराम यांच्या खांद्यावर पडली. या वेळी त्यांना तालुका कृषी विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे उत्तम सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. या ज्ञानाचा चांगला उपयोग शेतीत केला.
सेंद्रिय खत, शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खतांच्या वापरावर भर दिला. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीला बगल देत शेतीत नवनवीन प्रयोग केले. अगदी भुईमूग, सूर्यफुल, भाताची पट्टा पद्धत, एसआरटी पद्धत, ड्रम सिडरने भातलागवड असे विविध प्रयोग केल्याने आज या शेतकऱ्याला तालुका, जिल्हा, तसेच राज्य पातळीवरील आदर्श शेतकरी, शेतीनिष्ठ शेतकरी, असे विविध पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते मिळाले आहेत. यात त्यांच्या पत्नीचादेखील सिंहाचा वाटा आहे. तंत्रशुद्ध पद्धतीच्या शेतीचे श्रीराम पाडवी हे आदर्श ठरले आहेत.
शेतीची पाहणी
नुकतीच कल्याण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी, कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे, विस्तार अधिकारी सुनील संत, सुभाष आहेर यांनी पाडवी यांच्या शेतात भेट दिली. कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाने दिलेल्या विविध योजनांची पाहणी केली. यात विविध भातलागवड पद्धत, कडबा कुट्टी यंत्र, महिलांना व्यापारी छत्री, वजनकाटा, खुर्ची, टेबल, तसेच इतर साहित्याची पाहणी व प्रात्यक्षिके पाहिली, विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी शेतकरी श्रीराम पाडवी, दिलीप पाडवी, सरपंच, ग्रामपंचायत कोसले, गोपाळ भोईर, गोविंद भोईर, जनार्दन भोईर, कविता पारधी, तनुजा गायकर, करिष्मा गायकर, अनंता भोईर, दीपक दिवाने, ज्ञानेश्वर चौधरी, लक्ष्मण भोईर, विलास पाडवी, सुभाष भोईर, केदार भोईर आदी शेतकरी व महिला उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.