शहीद योगेश पाटील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण
खारघर, ता. १९ (बातमीदार) : खारघरमधील शाहिद योगेश पाटील पेट्रोल पंपावर शुल्लक कारणावरून आठ ते नऊ अज्ञात तरुणांच्या समुदायाने कर्मचाऱ्यांना मारहाण आणि महिलेस अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर सेक्टर १४ मधील शाहिद योगेश पाटील पंपावर रात्री साडे नऊच्या सुमारास तळोजामधील एक तरुण दुचाकीत पेट्रोल घेत असताना किरकोळ वाद झाला. यावेळी पेट्रोल पंपावरील मॅनेजर व इतर कर्मचाऱ्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी या तरुणाने त्याच्या आठ ते नऊ मित्रांना बोलावून पेट्रोल पंपावरील कर्मचारी रवी कुमार यास मारहाण केली. तसेच शहीद योगेश पाटील यांच्या वयोवृद्ध मातोश्री यांनी या तरुणाची समजूत घालत असताना तिलादेखील अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच पेट्रोलचे पैसे न देता पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मारहाणीत एका कर्मचाऱ्याचे कपडे फाडले असून त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे.
..................
वासुदेव बळवंत फडके उद्यानात योगसाठी शेड उभारण्याची मागणी
खारघर (बातमीदार): खारघर सेक्टर १२ मधील वासुदेव बळवंत फडके उद्यानात चिरतरुण योगा परिवाराकडून नियमित आणि मोफत योग प्रशिक्षण दिले जाते. पावसाळ्यात शेड नसल्याने योगाभ्यासात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पालिकेकडून उद्यानात शेड उभारण्यात यावे, असे पत्र भाजप जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल यांनी पालिका आयुक्त आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांना दिले आहे. खारघर परिसरात एकमेव भव्य उद्यान असून यामध्ये परिसरातील महिला, मुले तसेच वयोवृद्ध नागरिकांची वर्दळ असते. उद्यानात येणाऱ्या नागरिकांना चिरतरुण योगा परिवाराकडून नियमितपणे मोफत योगाचे धडे दिले जातात. मात्र पावसाळ्यात शेड नसल्याने योगाभ्यासात अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे योग परिवाराकडून योग शिक्षक विवेक खिर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोज सकाळी मोफत योग प्रशिक्षण दिले जाते. तसेच आयुर्वेदिक काढ्यांचे मोफत वितरण केले जाते. त्यामुळे पालिकेतर्फे दोन हजार चौरस फूट जागेत शेड उभारण्यात यावे, असे पत्र भाजप जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल आणि चिरतरुण योगा परिवाराचे अध्यक्ष शाम पाटील यांनी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांना दिले आहे.
................
‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या प्रयोगाला उलवेकरांचा प्रतिसाद
नवी मुंबई, ता. १९ ः नवी मुंबई नुकतेच सुरू झालेल्या सिडको भूमिपुत्र भवन, उलवे येथील नाट्यगृहामध्ये दीपीशा फाउंडेशन आणि दीपीशा कॅन्सर सेंटर तसेच रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी निधी जमा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेते समीर चौघुले यांनी त्यांच्या विनोद शैलीने सलग दोन तास प्रेक्षकांना खुर्चीमध्ये खिळवून ठेवले. उलवे येथील हा पहिलाच प्रयोग आणि तोही एका सामाजिक उपक्रमासाठी आयोजित केल्यामुळे विशेष गाजला. ९०० आसनक्षमता असलेले नाट्यगृह पूर्णपणे भरलेले होते. या कार्यक्रमासाठी साई मंदिर, वहाळचे संस्थापक रवी पाटील, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष संकल्प घरत, सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट नवी मुंबईचे रिजन हेड अंबादास खरात, ॲड. प्रतिभा पाटील यांनी विशेष उपस्थिती दिली.
...............
किरकोळ कारणावरून तरुणाच्या अंगावर घातली कार
नवी मुंबई (वार्ताहर) : रस्त्यावर कार घासल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका कारचालकाने दुसऱ्या कार चालकाच्या अंगावर कार घालून त्याला बोनेटवरून ५०० मीटर धोकादायक स्थितीत फरफटत नेल्याची घटना शुक्रवारी रात्री वाशीमध्ये घडली. या घटनेत कारच्या बोनेटवर असलेला कारचालक जखमी झाला असून त्याच्यावर एमजीएम हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी कार चालक व त्याच्या साथिदाराविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
या घटनेतील जखमी उमेश सुधाकर वाठोरे (वय ३०) हा घणसोली येथे राहण्यास असून आरोपी दिलीप सोपान बंदीछोडे (वय ४७) व रुतीक रोहिदास सनके ( वय २५) हे दोघेही कोपरखैरणे येथे राहण्यास आहेत. उमेश वाठोरे हा शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास मुंबईतून त्याच्या ब्रिझा कारमधून घणसोली येथे जात होता. यावेळी तो वाशीमध्ये आला असताना, आरोपी दिलीप बंदिछेड याची अर्टीगा कार उमेशच्या कारला घासली. त्यामुळे उमेश वाठोरे हा दिलीप बंदिछोडे याला जाब विचारण्यासाठी आपल्या कारमधून खाली उतरला. यावेळी दोघांमध्ये वादावादी होऊन त्यांच्यात भांडण झाले. त्यामुळे दिलीप बंदीछोडे याची कार अडवण्यासाठी उमेश त्याच्या कारसमोर उभा राहिला. याचवेळी आरोपी दिलीप बंदिछोडे याने आपली कार त्याच्या अंगावर घातली. त्यामुळे उमेश त्याच्या कारच्या बोनेटवर पडल्यानंतर दिलीप बंदिछोडे याने ही कार तशाच अवस्थेत वाशी सेक्टर-एक मधील बस स्टॉपवरून डावीकडे वळण घेऊन न्यु बॉम्बे हायस्कूलपर्यंत सुमारे ५०० मीटर पर्यंत नेली. न्यु बॉम्बे स्कूलसमोरील गतीरोधकामुळे त्याची कार आदळल्यानंतर उमेश कारवरून खाली पडला. या घटनेत उमेश वाठोरे हा जखमी झाला असून त्याच्यावर वाशीतील एमजीएम हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर आरोपी दिलीप बंदीछोडे हा देखील रुग्णालयात उपचार घेत आहे. उमेश वाठोरे याच्या तक्रारीवरून दिलीप बंदिछोडे व त्याच्या साथीदराविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.
............
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धापूर्वी पालिकेची बैठक
वाशी (बातमीदार) ः मुंबई विभागीय उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या उपस्थितीत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ता. २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पालिका जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धापूर्व बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाईन प्रणाली व नव्याने समावेश करण्यात आलेल्या विशेष बाबींविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ च्या आयोजनपूर्व बैठकीस नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील पालिका व शासन मान्यताप्राप्त खासगी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक तसेच शासन मान्यताप्राप्त अधिकृत खेळांच्या विविध असोसिएशनचे पदाधिकारी, शहरातील जिमखाना, स्पोर्टस् असोसिएशनचे प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
..........
तळोजा वसाहतीत फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू
खारघर (बातमीदार) : कमलू पाटील यांच्या ३३ वा स्मृतीदिन आणि कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून तळोजा वसाहतीत बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, पनवेल महापालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते, पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक गित्ते, नवी मुंबई महापालिकेचे निवृत्त उपायुक्त डॉ. जगन्नाथ सिम्मरकर, वाय. एस. टी. कॉलेजचे प्रा. डॉ. अमित अंबुलकर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राहुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. जी. के. डोंगरगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, बहुजन वंचित विकास संस्थाचे प्रदेशाध्यक्ष इकबाल नावडेकर, तळोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रविण भगत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उदघाटन प्रसंगी बबन पाटील म्हणाले, आपण स्वतः शिकलो नाही, मात्र माझ्या परिसरात एकही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहू नये. या प्रेरणेतून मी विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. पुढच्या काही वर्षात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.