देवनार कचराभूमी इतिहासजमा होणार
१८५ लाख टन कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः देशातील सर्वात जुनी देवनार कचराभूमी लवकरच इतिहासजमा होणार आहे. येथील तब्बल १८५ लाख टन कचऱ्याचा डोंगर हटवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर केला जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेने काढलेली निविदा हैदराबादच्या नवयुग इंजिनियरिंग कंपनीने जिंकली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महापालिका २,५४० कोटी रुपये खर्च करणार असून, येत्या ऑक्टोबरमध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
देवनार कचराभूमीची १२४ एकर जागा धारावी पुनर्विकासासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी येथील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाणार आहे. तीन वर्षांत ही जागा रिकामी केली जाणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने निविदा काढल्या होत्या. या निविदा प्रक्रियेला शेवटच्या दिवसापर्यंत तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. अखेर हे काम नवयुग इंजिनियरिंग लिमिटेड या कंपनीला मिळाली असून त्यांनी महापालिकेच्या अंदाजित खर्चाच्या तुलनेत ७.२९ टक्के कमी दर सूचवला होता.
पाच-सहा महिन्यांपूर्वी देवनार कचराभूमीच्या २३५ एकरपैकी मुंबई महापालिकेस आवश्यक असलेले क्षेत्र वगळून उर्वरित १२४ एकर जागा धारावी पुनर्विकासाला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. येथील ७५ एकरवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प राबवला जाणार आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२५ मध्ये कार्यान्वित होईल, तर उर्वरित जागा महापालिकेला कचराभूमीवर उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने देवनारची जागा ९९ वर्षाच्या भाडेतत्त्वावर मुंबई महापालिकेला दिली होती. शास्त्रोक्त प्रक्रिया करूनही जमीन रिकामी करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट पालिकेच्या घनकचऱ्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर करणे हा असून त्यामुळे डम्पिंग ग्राउंडवरील भार कमी होऊन वीजनिर्मिती अपेक्षित आहे.
----
तीन वर्षांत काम पूर्ण करणार
या संपूर्ण प्रकल्पासाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यात सामग्री व मनुष्यबळाची जमवाजमव आणि पावसाळा यांचा विचार करण्यात आला आहे.
..............
कचराभूमीबाबत...
स्थापना : १९२७
एकूण क्षेत्रफळ : १२६ ते १३२ हेक्टर
साठवलेल्या कचऱ्याची उंची : ३५ ते ४० मीटर
.............
कचऱ्याचे वर्गीकरण
४० टक्के
न कुजणारा कचरा
---
४८ टक्के
ओला कचरा
---
१० टक्के
सुका कचरा
--
२ टक्के
धातू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.