कर्जत, ता. २० (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये १९ जुलै २०२३ रोजी झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली असून, या पार्श्वभूमीवर मृत्यू पावलेल्या ग्रामस्थांना शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. आदिवासी समाज संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मालू निरगुडा हेही या वेळी उपस्थित होते. दिवसभर अनेकांनी या घटनेतील आठवणींना उजाळा दिला.
इर्शाळगडाच्या पायथ्याशी सुमारे ३७०० फूट उंचीवर वसलेल्या इर्शाळवाडीतील ४८ घरांमध्ये २२८ लोक राहात होते. भूस्खलनामुळे संपूर्ण वाडी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला, तर आजही ५७ जण बेपत्ता आहेत. केवळ १४४ जणांचे प्राण वाचले, ज्यामध्ये २३ बालकांचा समावेश होता. डोंगराळ व दुर्गम भागामुळे मदतकार्यात मोठे अडथळे आले. यंत्रसामग्री पोहोचू शकत नसल्याने माती हातांनी उपसावी लागली. २० ते २३ जुलैदरम्यान मदतकार्य राबवले गेले.
दुर्घटनानंतर सरकारने पुनर्वसनाचा निर्णय घेतला. खालापूर तालुक्यातील नानीवली गावाजवळील २.६ हेक्टर भूखंडावर सिडको व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहकार्याने नवी वाडी उभी केली जात आहे. चौक ग्रामपंचायतीच्या सहा एकर जागेत ४३ सुसज्ज घरे उभारण्यात आली असून, १२ तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे, मात्र पगार अपुरा असल्याची तक्रार आहे. या ३० कोटींच्या प्रकल्पात राहण्यासाठी घरे, शौचालये, वैद्यकीय सुविधा, नर्सरी, खेळाचे मैदान, २४ तास पाणी, कचरा व्यवस्थापन, सीसीटीव्ही यंत्रणा इत्यादी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
आरोग्य केंद्राचा अभाव
नवीन वाडी उभी राहात असली तरी अनेक मूलभूत सुविधा अद्याप कार्यान्वित नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत नाही, दफनभूमीसाठी जागा निश्चित नाही आणि घरपट्टीसंदर्भातील प्रक्रियाही प्रलंबित आहे. यामुळे रहिवाशांमध्ये अस्वस्थता आहे. अनेक कुटुंबांनी आपले नातेवाईक गमावले असून, त्यांचे दुःख आजही ताजे आहे. शेती बंद झाल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत कमी झाले असून, सरकारकडून अजूनही आर्थिक मदतीची वाट पाहात आहेत. स्थानिकांनी संपूर्ण पुनर्वसन आणि हक्काच्या सुविधांची मागणी केली आहे.
इर्शाळवाडी पुनर्वसन सरकारने उत्तमरित्या केले आहे, मात्र या ठिकाणी दफनभूमी अद्याप उपलब्ध नसून लवकरात लवकर ती करावी. तसेच रायगड जिल्ह्यात ८६ आदिवासी वाड्या दरडप्रवण क्षेत्रात आहेत. याबाबत वेळोवेळी सरकार दरबारी पत्रव्यवहार केला आहे. इर्शाळवाडीसारखी पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून सरकारने या वाड्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे.
- मालू निरगुडे, कोकण प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी संघटना
सहा एकर जागेत पुनर्वसन
चौक ग्रामपंचायतीने दिलेली सहा एकर गावठाण जागेत सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेली टुमदार घर, चोवीस तास पाण्याची व्यवस्था, अंगणवाडी, सभागृह आणि प्रशस्त रस्ते त्यामुळे सरकारने पुनर्वसन करताना कुठेही कमतरता ठेवली नसल्याचे जाणवते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाडीतील १२ तरुणांना सिडकोमध्ये रोजगार दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.