सभापती, संचालकांच्या पाठीशी ठामपणे उभा : कथोरे
बाजार समितीच्या प्रशासकाला इशारा; भूखंडावरून वाद
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : एकदा निवडणूक झाल्यावर प्रशासकाचा काही संबंध राहत नाही. सर्व अधिकार संचालक मंडळाकडेच जातात. त्यामुळे प्रशासकाची दाद घेण्याचा प्रश्नच येत नाही. जर दाद दिली गेली नाही तर सभापती, उपसभापती व संचालकांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे, असा सूचक आणि कठोर इशारा भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी बाजार समितीच्या प्रशासकाला दिला आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला देण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संचालक मंडळाने याला आक्षेप घेत भूखंड नियमबाह्य पद्धतीने वाटप केला गेल्याचा आरोप करीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व संचालक राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवरच आमदार कथोरे यांनी सोमवारी (ता. २०) पत्रकार परिषदेत प्रशासकाला इशारा देत सभापती व संचालक मंडळाला समर्थन दिले.
बाजार समितीच्या आवारातील रस्ते व भुयारी गटारांच्या समस्या तसेच इतर काही विकसकामांसंदर्भात संयुक्त विकास आराखडा तयार करून ती कामे मार्गी लावण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची आमदार कथोरे यांनी भेट घेतली. या वेळी सभापती रवींद्र घोडविंदे, उपसभापती जालिंदर पाटील, संचालक भाऊ गोंधळे आदी उपस्थित होते.
२७ गावांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावे पूर्वी आमदार कथोरे यांच्या विधानसभा मतदारसंघात होती. त्यानुसार या भागातील समस्या त्यांना परिचित आहेत. त्यामुळे त्यांनी पुढील मागण्या केल्या आहेत. २७ गावांतील जिल्हा परिषद शाळा महापालिकेकडे हस्तांतरित कराव्यात, अमृत योजना जलद गतीने पूर्ण करावी, रिंग रोड प्रकल्पातील अडथळे दूर करून पुनर्वसन करावे, कल्याण तहसील व पंचायत समिती कार्यालयासाठी नवी इमारत उभारून त्या ठिकाणी प्रशासकीय भवन साकारावे या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच पुढील टप्प्यात निर्णय घेतले जातील, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.