व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने सिने अभिनेत्रीची फसवणूक
दीड कोटीच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अंधेरी, ता. २२ (बातमीदार) ः व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने एका सिने अभिनेत्रीसह तिच्या पतीची सुमारे दीड कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शाम सुंदर डे, सारर्थी सुजीतकुमार गुहा आणि नेताई बाबूलाल मोडल अशी या तिघांची नावे असून, यातील शाम डे हे बंगाली चित्रपटातील निर्माते असून, इतर दोन आरोपी त्याच्या कंपनीत पार्टनर आहेत.
तक्रारदार महिला ही सिने अभिनेत्री असून, तिने हिंदीसह बंगाली आणि दाक्षिणात्य टीव्ही मालिकांसह चित्रपटात काम केले होते. एप्रिल महिन्यात तिची शाम डे यांच्याशी ओळख झाली. शाम हे बंगाली चित्रपटातील निर्माते आणि फायनान्सर म्हणून परिचित होते. त्याने तिला ओटीटी व्यवसायात गुंतवणुकीची ऑफर दिली व चांगला फायदा होईल, असे प्रलोभन दाखविले होते. चालू वर्षात प्रदर्शित होणाऱ्या १६ चित्रपटांचे प्रसारण हक्क मिळवून ते चित्रपट वायकॉम अठरा ओटीटीवर प्रदर्शित करण्याची त्यांची योजना होती. ही योजना चांगली वाटल्याने या अभिनेत्रीसह तिच्या पतीने त्यात गुंतवणुकीचा निर्णय घेतला व त्यांनी त्यांच्या नवीन कंपनीत एक कोटी ६८ लाखांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीनंतर त्यांच्यात एक करार झाला होता. हा संपूर्ण व्यवहार ९ एप्रिल ते २५ मे या कालावधीत झाला, मात्र शाम डे व इतर दोघांनी चित्रपटाच्या प्रसारणाचे हक्क मिळवून दिले नाहीत. गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करून त्यांची फसवणूक केली होती. याबाबत विचारणा केल्यानंतर आजारपणाचे कारण पुढे करून शाम डे हा रुग्णालयात अॅडमिट झाला होता. त्याच्या रुग्णालयातील सर्व खर्चही या दोघांनी केला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी गुंतवणुकीबाबत विचारणा करून त्यांच्या पैशांची मागणी केली होती. या वेळी त्याने तिला १० लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित एक कोटी ५८ लाख रुपये परत न करता याचा अपहार केला होता. हा प्रकार निदर्शनास येताच तिने बांगुरनगर पोलिसांत शाम डेसह इतर दोघांविरुद्ध तक्रार केली होती. तपासात शाम डे याच्याविरुद्ध अशाच प्रकारे कोलकाता येथील एका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीच्या नावाने त्याने मनीष सिंघानिया नावाच्या एका व्यक्तीची पावणेतीन कोटींची फसवणूक केली होती.