खाडीमध्ये अस्वच्छ पाणी साचल्याने नागरिक त्रस्त
घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) ः साकीनाका येथील खाडी क्रमांक ३मधील राजीवनगर झोपडपट्टीत थोड्याशा पावसाने अस्वच्छ पाणी साचले आहे. यामुळे नागरिक आणि पादचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महापालिका पाणी साचलेल्या भागातील पाणी काढण्यासाठी मोटारी बसवत असताना पाणी साचल्यानंतरही खाडी क्रमांक ३मध्ये मोटार बसवलेली नाही.
माहितीनुसार मागील तीन दशकांपासून साकीनाका येथील खाडी क्रमांक ३ आणि मिलिंदनगर झोपडपट्टीत पावसाळ्यात नेहमीच पाणी साचते. त्यानंतरही महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतेही ठोस उपाय केले जात नाहीत. यामुळे येथील रहिवाशांना थोड्याशा पावसातही अस्वच्छ पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. स्थानिक युवा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बंड यांनी सांगितले, की पावसाळ्यात सुंदरबाग आणि हिमालय सोसायटीसमोरील डोंगरातून अस्वच्छ पाणी मिलिंदनगर आणि राजीवनगर झोपडपट्ट्यांमध्ये वाहते. यामुळे येथे पाणी साचते. पावसाळ्यात येथे नेहमीच पाणी साचते. दरम्यान, महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतेही ठोस उपाय केले नाहीत. प्रदीप बंड यांनी कुर्ला एल वॉर्डच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे मिलिंदनगर आणि राजीवनगर झोपडपट्ट्यांमध्ये पाणी निचरा करण्यासाठी मोटार बसवण्याची मागणी केली आहे.