पेणधर जिल्हा परिषदेची शाळा धोकादायक घोषित
विद्यार्थ्यांचा मंदिरात अभ्यास; पालकवर्गांत चिंता
नवीन पनवेल, ता. २६ (बातमीदार) ः पनवेल तालुक्यातील पेणधर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक ठरविण्यात आल्याने सुमारे साडेतीनशे विद्यार्थी सध्या मंदिरात शिक्षण घेत आहेत; मात्र एकाच सभागृहात सर्व इयत्तांचे विद्यार्थी बसत असल्याने शाळा सुरू असली तरी अध्यापन ठप्प आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या तोंडावर ‘शिकायचंय, पण कुठे?’ हा असहाय्यतेचा सवाल केला जात आहे.
शाळेची इमारत धोकादायक घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे श्रीराम मंदिर, गावदेवी मंदिर आणि शिवमंदिरात तात्पुरते वर्ग भरवण्यात आले आहेत; मात्र लहान मुलांच्या गोंगाटामुळे आणि भाविकांच्या तक्रारीमुळे आता सर्व वर्ग फक्त विठ्ठल मंदिराच्या सभागृहात भरवले जात आहेत. त्या मोठ्या सभागृहात सर्व इयत्तांचे विद्यार्थी एकत्र बसतात, त्यामुळे शिक्षकांसाठी अध्यापन करणे अशक्य झाले आहे. शाळा रोज सुरू असली तरी अभ्यास मात्र सुरूच झालेला नाही. पेणधर शाळेसाठी एमबीएम विद्यालयाची इमारत भाडेतत्त्वावर उपलब्ध होण्यास तयार असून २५ जून रोजी संमतिपत्रही देण्यात आले आहे; मात्र अजूनही महापालिका किंवा शिक्षण विभागाकडून कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
.......................
स्वच्छतागृहांची अडचण
विठ्ठल मंदिराजवळ मोठे मोबाईल टॉयलेट उभे करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे ते गावाच्या दुसऱ्या टोकाला उभे आहे. अत्यंत नाईलाजाने विद्यार्थी जुने धोकादायक स्वच्छतागृह वापरत आहेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. दरवेळी शिक्षकांनाच विद्यार्थ्यांना सोबत न्यावे लागत आहे.
................
शाळा आहे... अभ्यास नाहीच!
एकाच छताखाली सर्व मुले एकत्र शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आवाज, गोंगाट, जागेचा अभाव, यामुळे शिक्षण पूर्णपणे ठप्प झाले आहे. दोन महिने उलटले तरी शैक्षणिक वर्षाला सुरुवातच झाली नाही, अशी पालकांची तक्रार आहे.
..................
आमच्याकडे संबंधित शाळेचा प्रस्ताव आला आहे. तो बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला असून भाडे ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत मी स्वतःही पाठपुरावा करीत आहे.
- रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी, पनवेल महापालिका
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.