मुंबई

ऊल्हासचा शेजार तरी पाण्यासाठी बेजार

CD

उल्हासचा शेजार तरी पाण्यासाठी बेजार
ब्रिटिशकालीन जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता कमी; बदलापूरला टंचाईच्या झळा
मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २६ : ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी, जीवन प्राधिकरणचे बारवी धरण, पूरस्थिती निर्माण होईल इतका कोसळणारा पाऊस, कोट्यवधी रुपयांच्या योजना, लाखो रुपये खर्च करून उभारलेले जलकुंभ तरीही बदलापूरची अवस्था पाण्यासाठी बेजार अशी झाली आहे, तर सध्या ऐन पावसाळ्यातही २० टक्के पाणीकपातीचे संकट आहे. या टंचाईच्या कारणांचा शोध घेतला असता याचे मूळ कारण येथील जलशुद्धीकरण केंद्रात आढळले. ब्रिटिशकालीन बॅरेज जलशुद्धीकरण केंद्राला १०० वर्षे झाली असून, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत त्याची क्षमता कमी ठरत आहे. तसेच नियोजनशून्य कारभाराचा फटकाही बसत आहे.

राहण्यास चांगले वातावरण, चांगली लोकवस्ती आणि परवडणारी घरे यामुळे मुंबई, उपनगरातून बदलापुरात वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या ही सर्वाधिक आहे. गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये बदलापूरचे नागरीकरण झपाट्याने झाले आहे. २४ तास पाणी देणार या भूलथापा देऊन, अनेक बांधकाम व्यावसायिक घरांची विक्री करत आहेत; मात्र प्रत्यक्षात २४ तास पाण्याचे स्वप्न पूर्ण होतच नसून अनेक भागांमध्ये तर एक दिवसाआड पाणी येत असल्याचे वास्तव आहे. त्यात ऐन पावसाळ्यात बदलापुरात २० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे बदलापूरला पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. उन्हाळा सुरू होण्याआधी जानेवारीपासून शहरात टँकरचा फेरा सुरू होतो. मे महिन्यात एका टँकरला हजारो रुपये खर्च करून पाण्याची गरज भागवली जाते. पावसाळ्यातही या समस्येपासून सुटका होत नाही. वास्तविक बदलापूर शहराच्या शेजारून बारमाही वाहणारी उल्हास नदी वाहते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बारवी धरणातून बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांमध्ये पाणीपुरवठा करते, पण शहराला आवश्यक असलेला पाणीसाठा उचलण्याची क्षमता बॅरेज जलशुद्धीकरण केंद्राची नसल्याने पाणी असूनही कोरडची ओरड कायम राहात आहे.

लोकसंख्या आणि पाण्याची गरज
बदलापूर शहराची आजची लोकसंख्या ही पाच ते साडेपाच लाखांच्या घरात आहे, तर सध्या स्थितीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहरात २७ हजार पाण्याचे कनेक्शन आहेत. या लोकसंख्येचा विचार करता साधारण ६५ ते ७० (एमएलडी) दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे; मात्र प्रत्यक्ष शहरात ४५ ते ४८ (एमएलडी) दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे. जवळपास २५ (एमएलडी) दशलक्ष लिटर पाण्याची तफावत सहज दिसून येत आहे. याची पुष्टी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेदेखील केली आहे.

बॅरेज जलशुद्धीकरणाची सद्यःस्थिती
बदलापूर पश्चिमेकडील उल्हास नदीच्या काठावर १९२८ मध्ये इंग्रजांनी बांधलेल्या बॅरेज धरणातून जलशुद्धीकरण करून, बदलापूर आणि अंबरनाथ शहर आणि ऑर्डनन्स फॅक्टरीला पाणीपुरवठा केला जातो. या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ही कमाल १४० एमएलडी इतकीच आहे आणि तितकीच ती वापरली जाते. इंग्रजांच्या काळात बॅरेज येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी हे तेव्हा ठाकुर्ली शहरापर्यंत पुरवले जात होते; मात्र वाढत्या शहरीकरणानंतर पाणीपुरवठ्यावर मर्यादा आणली. सध्या अंबरनाथ आणि बदलापूर या दोनच शहराला या ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो. अंबरनाथ शहराची पाण्याची गरज ही ७० ते ८० (एमएलडी) दशलक्ष लिटर, बदलापूरची ६५ ते ७० (एमएलडी) दशलक्ष लिटर, व ऑर्डनन्स फॅक्टरीला पाच (एमएलडी) दशलक्ष लिटरची आवश्यकता असते. पावसाळा सोडला तर बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात नदीतून रोज १४० (एमएलडी) दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते, मात्र पाणीगळती, विजेचा परिणाम, पाणीचोरी यातून दोन्ही शहरांना प्रत्यक्ष पाणी जवळपास २० ते ३० टक्के कमी होऊनच मिळते. त्यामुळे दोन्ही शहरात पाण्याची बोंब आहे.


पावसाळ्यातही टंचाईचे संकट!
बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र हे अगदी उल्हास नदीच्या काठावर आहे. या ठिकाणी उल्हास नदीतून पंपाच्या सहाय्याने, पाणी उचलले जाते व हेच पाणी या जलशुद्धीकरण केंद्रातील विविध प्रक्रियेतून जाऊन जलवाहिन्यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचते, मात्र पावसाळ्यात नदीत मोठ्या प्रमाणात गाळ उसळून वर आल्यामुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ होते. त्यामुळे हे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी दुप्पट प्रक्रिया आणि वेळदेखील जातो. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ, व ऑर्डनन्स यांच्यासाठी एकत्रितपणे पावसाळ्यात मात्र १२० (एमएलडी) दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होते. आणि याच कारणास्तव बदलापूर शहराला जिथे किमान ६० दशलक्ष लिटरच्या पाण्याची
गरज आहे, तिथे फक्त ४५ ते ५० दशलक्ष लिटर पाणी मिळते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात बदलापूरकरांवर पाणी संकट ओढवते.

जलकुंभांची क्षमता
बदलापूर पूर्व
१) खरवई : २ दशलक्ष लिटर
२) खरवई गाव: १ दशलक्ष लिटर
३) गांधी चौक : १.१ दशलक्ष लिटर
४) म्हाडा : २ दशलक्ष लिटर
५) शिरगाव : ३.५ दशलक्ष लिटर
६) कीर्ती पोलिस एरिया : १.५ दशलक्ष लिटर
६) कारमेल नवीन जलकुंभ: २ दशलक्ष लिटर
७) कीर्ती पोलिस एरिया नवीन जलकुंभ : १.५ दशलक्ष लिटर
८) पनवेलकर इस्टेट नवीन जलकुंभ: १.५ दशलक्ष लिटर


बदलापूर पश्चिम
१) बॅरेज : २ दशलक्ष लिटर
२) बदलापूर गाव : १.४ दशलक्ष लिटर
३) एम.बी.आर : ४.५ दशलक्ष लिटर
४) दत्त चौक : १ दशलक्ष लिटर
५) वडवली : ०.३५ दशलक्ष लिटर
६) एरंजाड : ०.४ दशलक्ष लिटर
७) साई गाव : ०.३० दशलक्ष लिटर
८) आमराई : २ दशलक्ष लिटर

रहिवासी संकुलांना एमआयडीसीचा पुरवठा बंद
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर दोन्ही शहरातील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्याचा ताण येत असताना, पर्यायी एमआयडीसी प्रशासनाच्या बारवीमधून होणारा पाणीपुरवठादेखील एमआयडीसी प्रशासनाने मागील वर्षापासून बंद केला आहे. १ एप्रिल २०२४ पासून एमआयडीसी प्रशासनाने रहिवासी संकुलांना नवीन पाण्याचे कनेक्शन देणे बंद केले आहे. त्यामुळे शहरात उभ्या राहणाऱ्या नवीन गृह संकुलांच्या पाणीपुरवठ्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे.

प्रशासनाचा ताळमेळ बसेना
बदलापूर शहरात नवीन गृह संकुलांच्या प्रस्तावाला बदलापूर पालिका सर्रास परवानग्या देत आहे; मात्र भविष्यातील या गृह संकुलांमधील नागरिकांना पाणीपुरवठा होणार कुठून? याची तजवीज किंवा नियोजन प्रशासनाने केलेले नाही. शहरात नवीन गृह संकुलांना मंजुरी देण्याचे काम पालिका करते तर पाणीपुरवठ्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करते. या दोन्ही प्रशासनांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे, पाणीपुरवठ्याचा मोठा ताण हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर येत आहे. त्यात शहरातील राजकारणी हेच बांधकाम व्यावसायिकसुद्धा आहेत. त्यामुळे आपल्या गृह प्रकल्पांना मंजुरी मिळवून घेणे हे त्यांना सहज शक्य होते, मात्र हेच राजकारणी पुढे या गृह संकुलातील नागरिकांना पाणी मिळत नाही म्हणून मोर्चे काढण्यासाठीसुद्धा पुढाकार घेतात आणि अशाप्रकारे बदलापूरकरांची दिशाभूल केली जाते.

विविध योजनांची सरबत्ती
बदलापूर शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी साधारण २००५ च्या दरम्यान काॅंग्रेस सरकारच्या काळात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत ही योजना राबविण्यात आली. त्यानंतर २०१५ मध्ये भाजप सरकारच्या काळात अमृत १ आणि अमृत २ योजना राबविण्यात आल्या; मात्र या सगळ्या योजनांपेक्षा लोकसंख्या वाढण्याचा दर जास्त आहे. त्यामुळे आजही पाण्याची समस्या जैसे थे आहे. त्यामुळे आता पुन्हा नगरोत्थानमधून, बदलापूरसाठी २६० कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केली असून, या माध्यमातून शहरात ७४ किमी लांबीची जलवाहिनी, १३ जलकुंभ, आणि मांजर्ली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, अशी या योजनेत तजवीज केल्याची माहिती आहे.

अंबरनाथला स्वतंत्र व्यवस्थेची गरज
सध्याच्या स्थितीला अंबरनाथ आणि बदलापूर ही दोन्ही शहरे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, मात्र या दोन्ही शहरातील पाणीपुरवठा करणारी यंत्रणा एकच असल्यामुळे दोन्ही शहराचा ताण एका यंत्रणेवर पडत आहे. त्यातच बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रातूनच दोन्ही शहरांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे अंबरनाथ शहर स्वतंत्र करून या शहरासाठी वेगळी पाणीपुरवठा योजना राबवून, या शहरासाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र राबवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी अंबरनाथ शहराच्या पाणी समस्येवर उपाय म्हणून, उल्हास नदीवर आधारित स्वतंत्र पाणी योजना केंद्र शासनाच्या अमृत टप्पा-२ अंतर्गत मंजूर करण्यात आली आहे. एकूण २५८.२८ कोटी रुपयांच्या योजनेसाठी केंद्र शासन, राज्य शासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हिस्सा देण्यात आला आहे व रायते पुलाच्या क्षेत्रात उल्हास नदीवर नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, मात्र काम पूर्ण व्हायला जवळपास पाच ते सहा वर्षे इतका काळ लागेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही शहरातील पाणी समस्या खऱ्या अर्थाने मार्गी लागेल.


आम्ही सर्वोतोपरी बदलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यावर भर देत आहोत; मात्र जलशुद्धीकरण केंद्राची पाणी उचलण्याची क्षमता आणि वाढती लोकसंख्या याचा मेळ बसत नसल्याने अडचण येत आहे. त्यात पावसाळ्यात पाणी उचलण्याची क्षमता अजून कमी होत असल्याने पावसाळ्यात आपसूकच पाणीकपात होते. जेव्हा अंबरनाथ शहराची स्वतंत्र पाणी योजना कार्यान्वित होईल, तेव्हा बदलापूर शहराचा पाणीप्रश्न मार्गी लागेल. सध्याची पाणी समस्या पाहता, पावसाळा संपेपर्यंत आम्ही नवीन पाणीजोडणीसाठी मंजुरी देणे स्थगित केले आहे.
- सुरेश खाद्री, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बदलापूर


नवीन गृह संकुलांना परवानगी देत असताना, पालिका प्रशासनाची जबाबदारी म्हणून आम्ही बांधकाम व्यावसायिकांना पाण्याची समस्या बघता पाणीपुरवठा करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रयत्नाने सुविधा करून देण्याच्या सूचना आम्ही करतो. त्याप्रमाणे त्यांनी त्या सुविधा रहिवाशांना करून द्यायच्या आहेत. तसेच सद्यःस्थितीत नगरोत्थानमधून २६० कोटींची पाणीपुरवठा योजनाही मंजूर झाली आहे. त्याच्या निविदा प्रक्रियेची सुरुवात केली आहे. साधारण दीड ते दोन वर्षात ही योजना कार्यान्वित होऊन बदलापूर शहराची पाणी समस्या सुटेल.
- मारुती गायकवाड, मुख्याधिकारी कुळगाव बदलापूर नगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 4th Test : टीम इंडिया लढली, भडली अन् मँचेस्टर कसोटीही वाचवली! गिलपाठोपाठ जडेजा, वॉशिंग्टनचीही शतकं

Crime News: भाजप नेत्याचा मुलाला ड्रग्जसह अटक! युवतीसोबत पळून जाताना थांबवले तर पोलिसांच्या अंगावर घातली गाडी

Dhananjay Munde: ...तर त्याला फाशी द्या, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

ENG vs IND 4th Test: जडेजाने इतिहास घडवला! गॅरी सोबर्स यांचा ५९ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी; लक्ष्मणच्याही पंक्तीत स्थान

Uddhav Thackeray: पुढचा काळ नक्कीच चांगला! राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक विधान; म्हणाले...

SCROLL FOR NEXT