नागपंचमीसाठी बाजारपेठ सजली
मातीच्या नागमूर्तींची मागणी वाढली
तुर्भे, ता. २७ (बातमीदार) : श्रावण महिना सुरू होताच सणांची रेलचेल सुरू होते. यंदा नागपंचमी मंगळवारी (ता. २९) साजरी होत असल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. पूजेच्या साहित्याची खरेदी सुरू झाली असून विशेषतः मातीच्या नागमूर्तींना मागणी वाढत आहे.
ग्रामीण भागात नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा केली जाते; मात्र शहरी भागात प्रत्यक्ष नाग किंवा वारूळ उपलब्ध नसल्यामुळे महिलांकडून मातीच्या नागमूर्तींची प्रतीकात्मक पूजा केली जाते. त्यामुळे बाजारात मातीच्या विविध रंगीबेरंगी नागमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. साधारण ३० ते ८० रुपयांपर्यंत या मूर्तींच्या किमती असून छोट्या, मध्यम व मोठ्या आकारात त्या उपलब्ध आहेत. याशिवाय पूजेच्या साहित्यांमध्ये फळे, फुले, दूर्वा, हळद-कुंकू, गंध, नैवेद्य साहित्य आणि नागपंचमी विशेष हार यांची आवकही वाढली आहे. रविवार व सुट्टीचा दिवस गाठून अनेकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. त्यामुळे व्यापाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
............
श्रावणातील प्रत्येक सणाचे वेगळे महत्त्व असून नागपंचमी ही वर्षातील सणांची सुरुवात मानली जाते. त्यामुळे बाजारपेठांमध्ये उत्सवाचे वातावरण तयार झाले आहे. विक्रेत्यांनीही रंगसंगतीत मूर्ती मांडून ग्राहकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. नागपंचमीसह संपूर्ण श्रावण महिना भक्तिमय वातावरणात पार पडावा, यासाठी नागरिक उत्सुक असल्याचे दिसते.