श्रावणात भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम
व्रतवैकल्यांना सुरुवात, महिलांसह भाविकांसाठी पर्वणी
पनवेल, ता. २७ (बातमीदार) ः हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू झाला आहे. संपूर्ण महिनाभर विविध धार्मिक व्रते, उत्सव, सण, पूजा-अर्चा यांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जाणारा श्रावण, विशेषतः महिलांसाठी आणि शिवभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या महिन्यात पारंपरिक पूजाअर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तिमय वातावरणामुळे समाजात उत्साह आणि एकोप्याची भावना निर्माण होते.
पनवेल व आसपासचा परिसर सध्या निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नदी-नाले, शेती यामुळे परिसर हिरवागार झालेला असून, पावसामुळे निसर्ग अधिकच खुललेला आहे. अशा रम्य वातावरणात श्रावण महिना सुरू झाल्याने परिसरातील मंदिरे आणि धार्मिक स्थळांमध्ये भक्तांची गर्दी वाढत आहे. विशेषतः मुंबई व नवी मुंबईसारख्या शहरी भागांतील नागरिक पनवेल परिसरातील मंदिरांकडे आकर्षित होत आहेत. निसर्ग, श्रद्धा आणि सामाजिक नाते यांचा संगम म्हणजे श्रावण. या महिन्यातील पूजा-अर्चा, व्रतवैकल्यांमुळे भक्तिभाव वृद्धिंगत होतो आणि समाजात स्नेह, एकोप्याची भावना दृढ होते. श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्रावणी सोमवार. या दिवशी महिलांकडून महादेवाच्या पिंडीवर विशिष्ट धान्य अर्पण केले जाते. पहिल्या सोमवारी तीळ, दुसऱ्या सोमवारी तांदूळ, नंतर मूग, जव आणि सातू असा क्रम असतो. नवविवाहित महिला पहिली पाच वर्षे नियमितपणे हे व्रत करतात. या पूजेमुळे सौभाग्य, समृद्धी आणि मानसिक समाधान मिळते, अशी श्रद्धा आहे. मंगळागौर पूजन हा महिलांचा उत्सव असून, या दिवशी पारंपरिक ओव्या, फुगड्या, गाणी, ओटी भरवणे आणि रात्री जागरणाचा कार्यक्रम असतो. नवविवाहित महिलांसाठी हा दिवस खास मानला जातो. नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा हे देखील श्रावणातील महत्त्वाचे सण आहेत. नागपंचमीला नागदेवतेची पूजा करून कृषी रक्षणासाठी प्रार्थना केली जाते. रक्षाबंधन हा स्नेहबंध दृढ करणारा सण आहे. कोळी समाजासाठी नारळी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची असून, समुद्र देवतेला नारळ अर्पण करून समुद्रात मासेमारीस प्रारंभ केला जातो. कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी यामुळे श्रावणात भक्तीबरोबरच आनंद आणि जल्लोषही पाहायला मिळतो. पोळा आणि पिठोरी अमावस्या या शेवटच्या सणांमुळे महिन्याची सांगता होते.
...................
चौकट
यंदाचे श्रावणी सोमवार
पहिला सोमवार : २८ जुलै
दुसरा सोमवार : ४ ऑगस्ट
तिसरा सोमवार : ११ ऑगस्ट
चौथा सोमवार : १८ ऑगस्ट
.................
श्रावण महिना म्हणजे भक्ती, संस्कृती आणि सामाजिक नात्यांचा उत्सव आहे.
-सुप्रिया फाळके
........
श्रावणी सोमवारी शिवपूजन केल्यास मानसिक समाधान, सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद मिळतो.
- सारिका जाधव, गृहिणी
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.